इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील चौथा कसोटी सामना ओव्हलच्या मैदानावर पार पडला होता. या सामन्यात भारतीय संघाने १५७ धावांनी विजय मिळवला होता. यासह कसोटी मालिकेत भारतीय संघाने २-१ ने विजयी आघाडी घेतली आहे. या मालिकेत भारतीय संघाला विजय मिळवण्याची सुवर्णसंधी आहे.
पण, अंतिम कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी गुरुवारी(९ सप्टेंबर) भारतीय संघाचे ज्युनियर फिजियो योगेश परमार यांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान, अंतिम कसोटी सामना होणार की नाही यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. अशातच सौरव गांगुली यांनी देखील आपले मत मांडले आहे.
बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी कोलकातामध्ये पार पडलेल्या ‘मिशन डॉमिनेशन’ पुस्तकाच्या प्रकाशनावेळी म्हटले की,”आम्हाला माहीत नाही की, सामना खेळवला जाणार की नाही. आम्ही अशी आशा करतो की, सामना होईल.”
दरम्यान, खेळाडूंची आरटी – पीसीआर चाचणी करण्यात आली आहे. त्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. पण भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर यांनाही काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले होते. त्यामुळे हे तिघेही विलगीकरणात आहेत. तसेच भारताचे मुख्य फिजिओ प्रशिक्षकांच्या संपर्कात आल्याने विलगीकरणात आहेत. आता, परमार पॉझिटिव्ह आल्याने भारताकडे एकही फिजिओ नाही.
तसेच बीसीसीआयच्या एका सूत्राने म्हटले होते की, “आरटी – पीसीआर चाचणीचा निकाल आल्यानंतर सामना होणार की नाही याबाबतचा निर्णय घेतला जाईल. खेळाडूंना आप-आपल्या रूममध्ये राहण्यास सांगितले आहे. तसेच खेळाडूंची आरटी – पीसीआर चाचणी केली जात आहे.”
इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये कसोटी मालिकेतील अंतिम कसोटी सामना येत्या १० सप्टेंबर पासून ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानावर पार पडणार आहे. हा सामना जिंकून भारतीय संघ मालिका ३-१ ने आपल्या खिशात घालू शकतो. दरम्यान हा सामना होणार की नाही, याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल.
महत्त्वाच्या बातम्या –
धोनीला भारतीय संघाचा मार्गदर्शक बनवण्यामागे ‘हे’ आहे मोठे कारण, गांगुलीकडून खुलासा
भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याची घोषणा; वनडे, टी२०, कसोटी मालिकेचे जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
सातत्याने निशाणा साधणाऱ्या गंभीरनेच धोनीला मेंटर करण्याच्या निर्णयाला दिला पाठिंबा, म्हणाला…