टीम इंडियाला पराभूत करणाऱ्या केन विलियमन्सनने केले या दोन खेळाडूंचे कौतूक

वेलिंग्टन । सोमवारी (24 फेब्रुवारी) बेसिन रिझर्व (Basin Reserve) येथे न्यूझीलंड विरुद्ध भारत (New Zealand vs India) संघात झालेल्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना न्यूझीलंडने 10 विकेट्सने जिंकला. यानंतर न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसनने (Kane Williamson) आपल्या संघाची प्रशंसा केली आहे.

“चार दिवस आम्ही चांगला प्रयत्न केला. भारतीय संघ संपूर्ण जगात किती मजबूत आहे, हे आम्हाला माहिती आहे. पहिल्या डावातील आमची खेळी, तसेच विरोधी संघाच्या धावा आणि खालच्या फळीतील फलंदाजांनी केलेल्या उत्कृष्ट धावा या गोष्टी आम्हाला आधार देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरल्या,” असे विलियम्सन म्हणाला.

या सामन्यात न्यूझीलडंचे अनुभवी गोलंदाज टीम साऊथी (Tim Southee) आणि ट्रेंट बोल्टने (Trent Boult) दुसऱ्या डावात चांगली कामगिरी करत 9 विकेट्स घेतल्या. दोन्ही डावात मिळून साऊथीने 9 तर बोल्टने 5 विकेट्स घेतल्या.

यावेळी विलियम्सन म्हणाला की, “सामन्याच्या पहिल्या दिवशी खेळपट्टीकडून काय अपेक्षा करावी हे आम्हाला माहिती नव्हते. कारण त्यापूर्वी फारसा वारा वाहत नव्हता, चेंडूदेखील अधिक स्विंग होत नव्हता. गोलंदाज शानदार होते. पंरतु खऱ्या अर्थाने हा संघाचा प्रयत्न होता.”

यावेळी कसोटी सामन्यात पदार्पण करणारा न्यूझीलंडचा युवा वेगवान गोलंदाज काईल जेमीसननेही (Kyle Jamieson) शानदार कामगिरी केली. तसेच पहिल्या डावात 4 विकेट्सही घेतल्या.

जेमीसनची प्रशंसा करताना विलियम्सन म्हणाला की, “जेमीसनने या कसोटी सामन्यात चांगली कामगिरी केली. पांढऱ्या चेंडूनेही त्याने चांगले योगदान दिले. जेमीसनने संघाच्या विजयात अनेक प्रकारे योगदान दिले त्यामुळे त्याचे पदार्पण शानदार ठरले.”

“साऊथीची मानसिकता स्वत:ला सिद्ध करण्याची नव्हती. त्याला गोलंदाजीचे नेतृत्व करायचे होते. यावेळी दुसऱ्या बाजूला बोल्ट असल्यामुळे साऊथीला फायदा झाला,” असेही विलियम्सन यावेळी म्हणाला.

 

You might also like