तब्बल 140 कोटी भारतीय क्रिकेटप्रेमींच्या आशा पूर्ण करण्यात रोहित शर्मा याच्या नेतृत्वातील भारतीय संघ अपयशी ठरला. 19 नोव्हेंबर रोजी 1 लाख 32 हजार प्रेक्षक संख्या असलेल्या अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअम येथे खेळल्या गेलेल्या विश्वचषक 2023 अंतिम सामन्यात बलाढ्य ऑस्ट्रेलियाने भारताचा 6 विकेट्सने धुव्वा उडवला. यासह ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा विश्वचषक किताबाचा मानकरी बनला. दुसरीकडे मात्र भारतीय संघाच्या पराभवानंतर देशभरातून आणि वेगवेगळ्या क्षेत्रातून तिखट प्रतिक्रिया येऊ लागल्या. यामध्ये राजकारणी व्यक्तींचाही समावेश आहे. काहींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर, तर काहींनी अंतिम सामन्याच्या ठिकाणावरून हल्लाबोल केला. अशात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही यामध्ये उडी घेतली.
काय म्हणाल्या ममता बॅनर्जी?
भारतीय संघ (Team India) विश्वचषक 2023 अंतिम सामना (World Cup 2023 Final) हारल्यापासून राजकारणी व्यक्तीही जोरदार प्रतिक्रिया देत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी स्टेडिअममध्ये जाऊन सामना पाहिल्याने विरोधी पक्षांना त्यांच्यावर निशाणा साधण्यासाठी नवीन मुद्दा मिळाला आहे. तसेच, आता या पराभवानंतर आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (West Bengal CM Mamata Banerjee) यांनी गुरुवारी (दि. 23 नोव्हेंबर) मोठा दावा केला. त्यांनी म्हटले की, विश्वचषकाचा अंतिम सामना कोलकाता किंवा मुंबईत खेळला गेला असता, तर भारत जिंकला असता.
एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी आरोप केला की, देशाच्या क्रिकेट संघाचे ‘भगवाकरण’ करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. त्या म्हणाल्या, “ते संपूर्ण देशाला भगव्या रंगात रंगवण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्हाला आमच्या भारतीय खेळाडूंचा अभिमान आहे. माझा विश्वास आहे की, जर अंतिम सामना कोलकाता किंवा वानखेडे स्टेडिअममध्ये झाला असता, तर आपण विश्वचषक जिंकलो असतो.”
भारतीय संघाने गमावला सामना
नरेंद्र मोदी स्टेडिअम (Narendra Modi Stadium) येथे पार पडलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. हा निर्णय त्यांच्या पथ्यावर पडला. यावेळी भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकात सर्व विकेट्स गमावत फक्त 240 धावाच केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने 43 षटकात 4 विकेट्स गमावत 241 धावा केल्या. तसेच, सामना 6 विकेट्सने खिशात घातला. अशाप्रकारे भारताचे 12 वर्षांनंतर वनडे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न पुन्हा धुळीस मिळाले. (west bengal cm mamata banerjee on world cup 2023 final india vs australia said this know here)
हेही वाचा-
अरे… ये क्या हुआ! चेंडूवर वीज बनून कोसळला ख्रिस गेल, जोरदार चौकार मारताच बॅटचे झाले दोन तुकडे, Video
पंड्या नाही, तर टी20 WCमध्ये ‘या’ खेळाडूला बनवावे भारताचा कॅप्टन; गंभीरने सुचवले नाव, विराटबद्दल म्हणाला…