सेंट लूसिया| ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर असून उभय संघात टी२० मालिकेचा थरार रंगला आहे. घरच्या मैदानावर वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू खासकरुन फलंदाज धुव्वादार प्रदर्शन करताना दिसत आहेत. पहिले २ सामने जिंकल्यानंतर वेस्ट इंडिजने सलग तिसरा टी२० सामनाही जिंकत विजयाची हॅट्रिक पूर्ण केली आहे. रविवारी रोजी (१२ जुलै) ग्रास आयलेट स्टेडियमवर पार पडलेल्या तिसऱ्या टी२० सामन्यात यजमानांनी ६ विकेट्सने पाहुण्यांना धूळ चारली. दरम्यान विस्फोटक फलंदाज ख्रिस गेल याने ऐतिहासिक कामगिरी केली.
टी२० क्रिकेटचा स्पेशलिस्ट गेल यापुर्वीच्या २ टी२० सामन्यात संघर्ष करताना दिसला होता. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांपुढे त्याच्या फलंदाजीचा टिकाव लागत नव्हता. मात्र तिसऱ्या टी२० सामन्यात त्याने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. मैदानाच्या चहूबाजूंनी चौकार-षटकारांचा मारा करत त्याने अर्धशतकाला गवसणी घातली. केवळ ३८ चेंडूंमध्ये ७ षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीने त्याने ६७ धावा चोपल्या.
या आक्रमक खेळीसह त्याने मागील ५ वर्षांपासूनचा अर्धशतकाचा दुष्काळ तर संपलवाच. सोबतच ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेटमध्ये नव्या आणि ऐतिहासिक विक्रमाचीही नोंद केली. २०१६ टी२० विश्वचषकात शेवटचे अर्धशतक केल्यानंतर हे त्याचे टी२० क्रिकेटमधील पहिले अर्धशतक होते. या अर्धशतक त्याने ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेटमधील आपल्या १४ हजार धावा पूर्ण केल्या आहेत. तब्बल ४३१ ट्वेंटी ट्वेंटी सामन्यांमध्ये १४०३८ धावा करत तो ट्वेंटी ट्वेंटीत १४ हजार धावांचा टप्पा पार करणारा पहिलावहिला फलंदाज ठरला आहे.
याबाबतील इतर कोणताही फलंदाज त्याच्या जवळपासही नाही. ट्वेंटी ट्वेंटीत सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत गेलनंतर कायरन पोलार्ड दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने एकूण १०८३६ धावा केल्या आहेत. तर पाकिस्तानचा शोएब मलिक १०७४१ धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
अशी झाली रंगतदार लढत
दरम्यान वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना १४१ धावा केल्या होत्या. २० षटकाखेर ६ गडी गमावत त्यांनी ही धावसंख्या उभारली होती. यात केवळ मोझेस हेन्रिक्स सर्वाधिक ३३ धावा करू शकला होता. तर वेस्ट इंडिजच्या हेडिन वॉल्शने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या होत्या.
ऑस्ट्रेलियाच्या १४२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ख्रिस गेलने ६७ धावांची ताबडतोब खेळी केली होती. तर निकोलस पूरननेही २७ चेंडूत नाबाद ३२ धावा करत संघाला विजय मिळवून दिला. केवळ १४.५ षटकातच ४ विकेट्स गमावत वेस्ट इंडिजने हे आव्हान पूर्ण केले होते. गेलला त्याच्या दमदार प्रदर्शनासाठी सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
महत्वाच्या बातम्या-
फलंदाजी प्रशिक्षकाला कोरोना झाल्याने श्रीलंकेच्या सपोर्ट स्टाफमध्ये बदल, आता ‘हा’ दिग्गज देणार धडे
श्रीलंका बोर्डाने घोषित केली भारत-श्रीलंका सामन्यांची वेळ, पाहा किती सुरू होणार मॅच?