भारत सरकारने गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स (GST) च्या दरांमध्ये बदल केला आहे. या सुधारण्यात वैद्यकीय आणि शिक्षण क्षेत्रातील किंमती कमी झाल्या आहेत. क्रिकेटवर याचा मोठा परिणाम झाला आहे. नव्या जीएसटी स्लॅबमध्ये आयपीएल तिकीटांना लक्झरी गुड्स म्हणून ठेवण्यात आले असून आता आयपीएल तिकिटांवर तब्बल 40 टक्के जीएसटी लागणार आहे. या नव्या जीएसटी स्लॅबमुळे स्टेडियममध्ये जाऊन आयपीएल पाहणे आता आधीपेक्षा जास्त महाग होणार आहे आणि त्याचा थेट परिणाम आयपीएल 2026 मधील तिकीटांच्या किंमतीत दिसून येईल.
आयपीएल तिकिटावर यापूर्वी 28% जीएसटी लागत होता, पण आता आयपीएल 2026 पासून 40% जीएसटी आकारला जाणार आहे. उदाहरणार्थ, एखाद्या आयपीएल तिकिटाची किंमत टॅक्सशिवाय 1,000 रुपये धरली, तर 28 टक्के जीएसटी लावल्यावर त्या तिकिटाची किंमत 1,280 रुपये होत होती. पण आता 40 टक्के जीएसटी लावल्यामुळे एका आयपीएल तिकिटाची किंमत 1,400 रुपये होणार आहे.
आयपीएलमध्ये तिकिटांच्या किंमती फ्रेंचायझी स्वतःच ठरवतात, यात भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI) कोणताही हस्तक्षेप करत नाही. आयपीएलमध्ये आतापर्यंत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची तिकिटे सर्वात महाग विकली गेली आहेत. आरसीबीच्या तिकिटांच्या किंमतींनी 50,000 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. 2024 मध्ये एका तिकिटाची किंमत 55,000 रुपयांपर्यंत पोहोचली होती, तर 2026 मध्ये हा आकडा 60,000 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
जीएसटी रिफॉर्मचा आयपीएलवर काही काळासाठी परिणाम होऊ शकतो, पण या लीगमध्ये तिकिटांच्या तुलनेत जास्त महसूल स्पॉन्सरशिप डील्स, टीव्ही हक्क आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर होणाऱ्या लाईव्ह स्ट्रीमिंगमधून मिळतो. सर्व आयपीएल तिकिटे विकली नाहीत तरी फ्रेंचायझी ही तिकिटे स्पॉन्सर्स आणि राज्य क्रिकेट संघटनांच्या क्लब मेंबर्सना देतात. त्यामुळे तिकिटांच्या किंमतींमुळे फ्रेंचायझीला फारसा तोटा होणार नाही. सामने पाहायला जाणाऱ्या प्रेक्षकांच्या खिशावर अतिरिक्त भार पडणार आहे.





