भारत आणि अमेरिका यांच्यात बुधवारी (12 जून) खेळल्या गेलेल्या सामन्यात टीम इंडियाला 5 धावा मोफत देण्यात आल्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा (ICC) ‘स्टॉप क्लॉक’ हा एक नवा नियम आहे. या नियमानुसार अमेरिकेला 5 धावांची पेनल्टी देण्यात आली होती. या पेनल्टी अंतर्गत टीम इंडियाला 5 धावा मिळाल्या. पण हा ‘स्टॉप क्लॉक’ नियम आहे तरी काय? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. चला तर मग, या बातमीद्वारे जाणून घेऊया.
‘स्टॉप क्लॉक’ नियमानुसार, नवीन षटकाच्या सुरुवातीला जर गोलंदाजी करणाऱ्या संघानं तीन वेळा एका मिनिटापेक्षा जास्त वेळ घेतल्यास संघाला 5 धावांचा दंड आकारला जाईल. टी20 विश्वचषक 2024 मध्ये हा नियम लागू करण्यात आला आहे. या नियमानुसार, गोलंदाजी करणाऱ्या संघाला पुढील षटकाची सुरुवात एका मिनिटात करावी लागेल. जर संघानं एकदा किंवा दोनदा या नियमाचा भंग केला, तर त्यांना ताकीद दिली जाते. परंतु तिसऱ्यांदा असं झालं, तर गोलंदाजी करणाऱ्या संघाला 5 धावांचा दंड ठोठावला जातो. दंड म्हणून फलंदाजी करणाऱ्या संघाच्या खात्यात 5 धावा जमा होतात.
या सामन्यात 15 वं षटक पूर्ण झाल्यानंतर अमेरिकेला 5 धावांचा दंड ठोठावण्यात आला. तोपर्यंत अमेरिकेनं तीन वेळा ओव्हर सुरु करण्यासाठी एका मिनिटापेक्षा जास्त वेळ घेतला होता. यामुळे भारतीय संघाला 5 धावा मिळाल्या.
अमेरिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात टीम इंडियानं नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना अमेरिकेनं 20 षटकात 8 गडी गमावून 110 धावा केल्या होत्या. भारताकडून अर्शदीप सिंगनं सर्वाधिक 4 बळी घेतले. 111 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियानं 18.2 षटकात 3 गडी राखून विजय मिळवला.
विराट कोहली (0) आणि रोहित शर्मा (3) यांच्या रूपानं टीम इंडियानं 2.2 षटकात 2 विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर 8व्या षटकात रिषभ पंतही 18 धावा काढून बाद झाला. यानंतर सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे यांनी नाबाद भागीदारी करत संघाला विजयापर्यंत नेलं. दोघांनी चौथ्या विकेटसाठी 65 चेंडूत नाबाद 67 धावा जोडल्या. सूर्यानं 49 चेंडूत 2 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीनं नाबाद 50 धावा केल्या, तर दुबेनं 35 चेंडूत 1 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीनं नाबाद 31 धावा केल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
भारताच्या विजयाचा पाकिस्तानला फायदा! सुपर-8 चं समीकरण बनलं आणखी रोमांचक
मोक्याच्या क्षणी सूर्या आला फॉर्ममध्ये! सर्व टीकाकारांची बोलती बंद
सेमी फायनलपूर्वीच भारत-ऑस्ट्रेलिया येणार आमनेसामने! कसं ते समजून घ्या