fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

खेळ कबड्डी भाग-४: प्रो कबड्डीने आपल्याला काय दिले?

शाळेत असताना १४ वर्षाखालील गटामध्ये कबड्डी खेळण्यासाठी सरांनी माझी निवड केली. अगोदर फक्त मजा म्हणून कबड्डी खेळणारा मी पहिल्यांदा स्पर्धात्मक कबड्डी खेळणार होतो. साहजिकच मला उत्सुकता लागून राहिली होती. त्यानंतर माझ्या शाळेच्या संघासाठी मी सलग तीन वर्षे कबड्डी खेळलो. 

विश्वचषक सोडला तर टीव्ही आणि कबड्डीचे सामने यांचा फारसा संबंध तोपर्यंत येत नसे. त्यामुळे आणि स्वतः एक कबड्डी खेळाडू असल्याने प्रो कबड्डी लीगची घोषणा झाल्यानंतर साहजिकच त्याबद्दल उत्सुकता चाळवली गेली. २०१४ मध्ये जुलैच्या सुमारास पहिला हंगाम सुरू झाला होता. पहिला सामना यू मुंबा आणि जयपूर पिंक पँथर्स या संघांमध्ये होता. पहिला सामना पाहिल्याबरोबरच ही लीग यशस्वी होणार याबद्दल माझी खात्री पटली. या अगोदर भारतीयांनी क्रिकेट, फुटबॉल, टेनिस अशा खेळांच्या लीग अनुभवल्या होत्या. पण मराठमोळ्या कबड्डीची लीग जगभरात पहिल्यांदाच होत होती.

आयपीएलने भारताला अनेक नवे खेळाडू दिले. त्याचप्रमाणे ही लीगही भारतीय कबड्डी संघाला नवे खेळाडू देणार याबद्दल शंका नव्हती. तसंही कबड्डी खेळाडूंना आपल्या देशात फार चांगले दिवस नव्हतेच. या लीगच्या निमित्ताने निदान त्यांचा तरी फायदा होईल अशी एक आशा मात्र होती.

संघमालक या लीगकडे व्यावसायिक दृष्टीकोनातून बघत असले तरी आपल्या संघातील खेळाडूंबद्दल त्यांच्याही मनात आपुलकी निर्माण झाली होती. अगदी एका कुटूंबाप्रमाणे हे खेळाडू रहात  होते.

 पहिल्या पर्वादरम्यान जयपूर पिंक पंथर्सचा संघमालक अभिषेक बच्चनने एक मुलाखत दिली होती. त्यात त्याने सांगितले होते,”यातले काही खेळाडू इतक्या गरीब घरातून आले होते की फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहणे सोडा त्यांनी फाईव्ह स्टार हॉटेल याआधी पाहिले सुद्धा नव्हते.”

एक संघमालक म्हणून अभिषेकचा उत्साह नेहमीच पाहण्याजोगा असतो. आपल्या संघाने गुण मिळवला तर तो त्वेषाने आपला आनंद साजरा करताना दिसतो. सामना जर अटीतटीचा होत असेल तो तितकाच गंभीर झालेलाही दिसतो. बऱ्याचदा आपल्या खेळाडूंना प्रेरणा मिळावी म्हणून तो आपल्या संघासोबत प्रवासही करतो. अभिषेकप्रमाणे यू मुंबा संघाचे मालक रॉनी स्क्रुवाला देखील आपल्या संघाच्या बहुतेक सामन्यांना हजेरी लावतात. इतरही मालक आपापल्या संघांबरोबर दिसतात. 

लीगचा पहिलाच हंगाम प्रचंड यशस्वी ठरला. अनुप कुमार, अजय ठाकूर, राकेश कुमार, मनजीत चिल्लर, शब्बीर बापू, रिशांक देवडीगा यांसारखे अनेक खेळाडू जे बहुसंख्य लोकांना आधी माहीत नव्हते, ते आपल्या खेळाच्या जोरावर रातोरात स्टार झाले. गल्लीबोळात रोज संध्याकाळी होणाऱ्या सामन्यांच्या चर्चा ऐकू येऊ लागल्या, घरातील सगळीच मंडळी कबड्डी पाहू लागली.

पहिल्या हंगामात सगळ्यात महागडा खेळाडू १२.५ लाख रुपयांना विकत घेतला गेला होता. पाचव्या हंगामात हाच आकडा ९३ लाखावर गेला यावरून प्रो कबड्डीची लोकप्रियता ध्यानात येईल.आपल्या संघाने लीग जिंकावी म्हणून संघमालक मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करायला तयार असतात. स्पर्धेचे बहुसंख्य सामनेदेखील हाऊसफुल्ल असतात. प्रेक्षकांमध्ये अगदी लहान मुलांपासून ते ७० वर्षांच्या आजी आजोबांपर्यंत सगळेच असतात. माझे वडील वयाच्या ६९ व्या वर्षीदेखील अतिशय उत्साहाने हे कबड्डीचे सामने बघतात.

त्या निमित्ताने अनेकांची घरे मार्गी लागली.अनेक खेळाडूंची स्वप्ने पूर्ण झाली, आपला मुलगा फक्त कबड्डी खेळतोय आणि पैसे कमावित नाही असे वाटणाऱ्या त्यांच्या आईवडिलांना आता आपल्या लेकाचे कौतुक वाटू लागले.रिशांक देवडीगा सारखा खेळाडू याचेच उदाहरण म्हणता येईल. अनेक खेळाडूंची लोकप्रियता इतकी वाढली की क्रिकेटवेड्या या देशामध्ये  कबड्डीपटूंना फक्त पाहण्यासाठी लोक गर्दी करू लागले. या वर्षीच्या हंगामात यू मुंबाचा संघ स्पर्धेबाहेर गेलेला असूनही मी केवळ अनुप कुमारचा बुद्धिमान खेळ बघायला मिळावा म्हणून तो सामना पहायला गेलो. 

यु मुंबाचा सामना दुसरा होता. पण पहिल्या सामन्यादरम्यान जेव्हा अनुप स्टेडियममध्ये आला तेव्हा लोक “अनुप, अनुप” असे जोरजोरात ओरडत होते. नकळतपणे मला सचिन बॅटिंगला आल्यावर वानखेडेवरच्या “सचिन सचिन”ची आठवण झाली.अनुप भलेही सचिनइतका लोकप्रिय नसेल,पण आजमितीला कबड्डीच्या खेळातील “सचिन तेंडुलकर” मात्र नक्कीच आहे!

सामना संपल्यानंतर दोन्ही संघ मैदानातून बाहेर गेले होते पण अनुप मात्र मुलाखतीसाठी थांबून होता. आमच्या स्टँडमध्ये ३०-३५ लोक फक्त अनुपला जवळून पहायला मिळावे म्हणून सामना संपल्यानंतरसुद्धा थांबून होते. त्यानेही या प्रेक्षकांना निराश केले नाही. 

एरवी भारतीय कबड्डीपटूंची नावेही माहीत नसलेल्या आपल्याला आता इराण, दक्षिण कोरिया या देशांचे खेळाडू नावानिशी माहीत असतात. त्यांची वेगवेगळ्या हंगामातील आकडेवारी माहित असते.आजमितीला गल्लीबोळातील पोरांना प्रो कबड्डी खेळणाऱ्या पाच भारतीय खेळाडूंची नावे विचारली तर निश्चितच माहीत असतील. श्रीकांत जाधव सारखा ग्रामीण भागातून आलेला खेळाडू लोकांना या निमित्ताने माहित झाला. पुण्यात यु मुंबाचा सामना असताना त्याच्या गावातून ४०-५० लोक फक्त “आपल्या श्रीकांत”ला पहायला आले होते. 

प्रो कबड्डीच्या निमित्ताने त्या त्या खेळाडूची विशेष अशी शैली लोकांना माहीत झाली. वेगवान खेळ केवळ एका रेडमध्ये शांत करणारा अनुप कुमार, डुबकी किंग म्हणून प्रसिद्ध झालेला प्रदीप नरवाल, सुपर रेडर राहुल चौधरी, लंबुटांग असलेला मराठमोळा काशीलिंग आडके असे अनेक खेळाडू लोकांना या निमित्ताने माहीत झाले.

भारताची जागतिक कबड्डीवर कायमच हुकूमत राहिली आहे. गेले तीनही विश्वचषक भारतानेच जिंकले आहेत. प्रो कबड्डीच्या निमित्ताने अनेक युवा खेळाडूंना आपले कसब दाखविण्याची संधी मिळाली.भारतीय संघ निवडताना डोकेदुखी व्हावी इतक्या संख्येने खेळाडू उपलब्ध आहेत हे एक चांगले लक्षण आहे. सध्या कबड्डीचा समावेश ऑलिंपिक स्पर्धांमध्ये नाहीये. प्रो कबड्डीला मिळालेले यश पाहता, इंटरनॅशनल कबड्डी फेडरेशन २०२० च्या ऑलिंपिकमध्ये कबड्डीचा समावेश व्हावा म्हणून प्रो कबड्डीचा आधार घेईल याबाबत नक्कीच विश्वास वाटतो. 

 

-आदित्य गुंड
(लेखक कबड्डी खेळाडू असून कबड्डी अभ्यासकही आहेत.  )

You might also like