क्रिकेटच्या मैदानात चालू सामन्यात अनेकदा व्यत्यय येतो. पाऊस, वादळ, अपुरा प्रकाश या नैसर्गिक गोष्टींमुळे अनेकदा सामना थांबतो. तर, कधी कुत्रा कधी मांजर तर कधी पक्षी मैदानात घुसतात. काही अतिउत्साही प्रेक्षक देखील मैदानात अनेकदा चक्कर मारताना दिसतात. २०१८ मध्ये तर दिल्लीतील रणजी सामन्या दरम्यान एक महाशय चक्क गाडी घेऊन मैदानात घुसले होते. पण, २००७ काउंटी चॅम्पियनशीप दरम्यान एका विचित्र कारणानेच सामना थांबवला गेला होता.
ओल्ड ट्रॅफर्ड येथे २००७ च्या काउंटी चॅम्पियनशिपमध्ये यजमान लँकशायरचा सामना केंटसोबत होता. केंटने या सामन्याआधी सहा सामने खेळलेले त्यापैकी त्यांनी दोन जिंकले आणि दोन गमावले होते. दुसरीकडे, लँकशायर संघाने त्यांच्या पहिल्या सहा सामन्यांपैकी फक्त एक सामना जिंकला होता. परंतु, लँकशायर एकाही सामन्यात पराभूत झाले नव्हते.
जेम्स अँडरसन, मुथय्या मुरलीधरन, ब्रॅड हॉज आणि कर्णधार स्टुअर्ट लॉ यांसारखे दिग्गज त्या हंगामात लँकशायर संघात होते.
यजमान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, पहिल्या दिवशी केवळ ५० षटकांचा खेळ शक्य झाला. दुसर्या दिवशी त्यांनी आक्रमक फलंदाजी करत ६२ षटकांत २८७ धावा केल्या. ब्रॅड हॉजने २०० चेंडूंत नाबाद १५६ धावा फटकावल्या. लँकशायरने दोन दिवसांत ४५१-५ अशा भल्यामोठ्या धावसंख्येवर आपला डाव घोषित केला.
केंटचा डाव सुरू झाल्यावर, मुरलीधरन, अँडरसन, डॉमिनिक कॉर्कने अनुक्रमे चार, तीन आणि दोन गडी बाद करत केंटला २७२ धावांवर रोखले. १७९ धावांची आघाडी मिळाल्याने लँकशायरने केंटला फॉलोऑन दिला. लँकशायरच्या गोलंदाजांचा फॉर्म पाहता, चौथ्या आणि अखेरच्या दिवशी फक्त पाऊसच केंटला पराभवापासून वाचवू शकत होता. चौथ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात केंटची अवस्था ५८-३ अशी झाली होती.
मार्टिन जार्सवेल्ड आणि डॅरेन स्टीव्हन्स यांना पराभव टाळण्यासाठी किमान एक पूर्ण सत्र खेळून काढावे लागणार होते. पण अचानक, मैदानावरील ‘फायर अलार्म’ वाजल्याने सामना थांबविण्यात आला व सर्व खेळाडूंना सुरक्षितस्थळी जमा केले गेले. काही मिनिटातच अग्निशामक दलाच्या दोन गाड्या मैदानावर हजर झाल्या. शोधाशोध केल्यानंतर समजले की, स्वयंपाकघरातील जळलेल्या ग्रेव्ही पॉटमुळे धूर निर्माण झाल्याने अलार्म वाजला होता. अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्याने स्पष्टीकरण दिले की, “याआधी देखील याठिकाणी अशा घटना घडल्या आहेत. हंगामाच्या सुरुवातीलाच ड्रेसिंग रूममध्ये टोस्ट जळाल्याने अलार्म वाजला होता.”
अर्ध्या तासानंतर पुन्हा दोन्ही संघ मैदानात उतरले.
ग्रेव्ही ब्रेकनंतर, जार्सवेल्ड आणि स्टीव्हन्सची जोडी केंटला पराभवापासून वाचवण्यासाठी प्रयत्न करू लागली. या दोघांनी केवळ ७४ मिनिटांत १०० धावांची भर घातली. स्टीव्हन्स ६३ चेंडूंत ५५ धावा काढून धावबाद झाला. स्टीव्हन्स बाद झाल्यावर केंटची छोटीशी घसरगुंडी झाली व त्याच्यापाठोपाठ दोन गडी बाद झाले. तरीदेखील, केंट सामना वाचू शकत होते कारण जार्सवेल्ड ८५ धावांवर नाबाद होता.
अशातच पंचांनी, अपुऱ्या प्रकाशामुळे सामना थांबवला जाऊ शकतो असे सांगितले. त्यामुळे, लँकशायरचा कर्णधार स्टुअर्ट लॉ याने दोन्ही बाजूने फिरकी गोलंदाज गोलंदाजीला लावले. एका बाजूने डावखुरा फिरकीपटू गॅरी केडी तर दुसऱ्या बाजूला दिग्गज मुरलीधरन ही जोडी गोलंदाजी करत होती. या दोघांनी शेवटचे चार गडी बाद करण्यासाठी अवघे २१ चेंडू घेतले. केंटचा दुसरा डाव १९० धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे, लँकशायरला विजयासाठी १२ धावांचे लक्ष्य मिळाले. त्यानंतर,लँकशायरच्या दोन्ही सलामीवीरांनी २.५ षटकात हे आव्हान पूर्ण केले.