क्रिकेटमध्ये दोन कौशल्य प्रामुख्याने वापरली जातात ती म्हणजे बॅटिंग आणि बॉलिंग. प्रत्येक क्रिकेटर यापैकी एका कौशल्यात नक्कीच पारंगत असतो. टीम कॉम्बिनेशनचा विचार करताना एखाद-दोन ऑल राऊंडर आणि बाकी स्पेशालिस्ट खेळवण्यावर कॅप्टनचा विश्वास असतो. टीममधील सहा सात खेळाडू आपल्याला बॉलिंग करतानाही दिसतात. मात्र, कधी प्लेइंग इलेव्हनमधील सर्वच्या सर्व खेळाडूंनी बॉलिंग केल्याचे ऐकले आहे का? डोमेस्टिक क्रिकेटमध्ये कधीतरी अशी घटना घडते. मात्र, इंटरनॅशनल लेवलला ही घटना घडण्यासाठी शतक आणि त्यानंतर अनेक वर्ष उलटावी लागलेली. मॉडर्न डे क्रिकेटमध्ये अशाच प्रकारे सर्वच्या सर्व 11 खेळाडूंनी बॉलिंग करण्याचा प्रसंग आला 2002 मध्ये, आणि ते करून दाखवलं टीम इंडियाने.
टीम इंडियाने ही दुर्मिळ घटना केव्हा घडवली? हे जाणून घेण्याआधी ती पहिल्यांदा कधी घडली हे देखील माहीत करून घेणे गरजेचे आहे. इंटरनॅशनल क्रिकेटला सुरुवात झाली तेव्हा दोन प्रमुख देश होते इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया. 1884 मध्ये ओव्हलवर या दोन्ही देशात झालेल्या टेस्टमध्ये इंग्लंडच्या सर्वच्या सर्व 11 जणांनी बॉलिंग केलेली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे विकेटकीपर आल्फ्रेड लिटेल्टन यांनी 12 ओव्हर टाकताना सर्वाधिक 4 विकेट्स घेतलेल्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असाच दुसरा प्रसंग आला 1980 मध्ये. पाकिस्तान टूरवर आलेल्या ऑस्ट्रेलियाने फैसलाबाद टेस्टमध्ये फ्लॅट विकेटवर पहिली बॅटिंग करताना 617 रन्स बनविले. मात्र, पाकिस्तान बॅटिंगला आल्यावर त्यांच्या सर्व 11 खेळाडूंना बॉलिंग करावी लागली. एकटे ज्योफ डायमॉक सोडले तर अन्य कोणाला विकेटही मिळाली नाही. क्रिकेट इतिहासातील सर्वात नीरस टेस्टमध्ये या टेस्टचा समावेश होतो.
यानंतर नंबर लागतो आपल्या आजच्या लेखाचा विषय असलेल्या घटनेचा. टीम इंडिया 2002 मध्ये वेस्ट इंडिज टूरवर गेलेली. 5 टेस्ट आणि 5 वनडे अशी लांबलचक ही टूर होती. सुरुवातीला टेस्ट सीरिज खेळली गेली. ज्यात यजमानांनी 2-1 अशी सरशी साधली. मात्र, यातीलच चौथ्या टेस्टमध्ये टीम इंडियाने आपले सर्वच्या सर्व बॉलर वापरले.
ऍटिग्वा येथे सिरीजमधील चौथी टेस्ट होणार होती. दोन्ही संघ इथे पोहोचले तेव्हा सीरिज 1-1 अशा बरोबरीत उभी राहिलेली. वेस्ट इंडिजचा कॅप्टन कार्ल हूपरने टॉस जिंकत पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला. खेळपट्टी अगदीच फ्लॅट दिसत होती. मात्र शिवसुंदर दास फक्त तीन रन्स करून आऊट झाला. त्यानंतर युवा वसीम जाफर आणि अनुभवी राहुल द्रविड याने 155 रन्सची तगडी पार्टनरशिप लावली. जाफर 86 आणि द्रविड 91 रन्स करून आऊट झाला. सचिन तर गोल्डन डक. त्यानंतर सहाव्या नंबरवरील लक्ष्मणने धैर्य दाखवले आणि तो उभा राहिला. यादरम्यान एक वाईट घटना घडली. सातव्या नंबरवर बॅटिंग करत असलेला टीम इंडियाचा मेन स्पिनर अनिल कुंबळे (Anil Kumble Jaw) वाईटरीत्या जखमी झाला. मर्व डिलनचा एक वेगवान बाऊंसर त्याच्या जबड्यावर येऊन लागला. रक्त वाहू लागले. तरीही त्याने इच्छाशक्ती दाखवली आणि आणखी 20 मिनिटे बॅटिंग केली. संध्याकाळी समजलं की त्याचा जबडा तुटला आहे.
कुंबळे आऊट झाल्यानंतर आठव्या नंबरवर बॅटिंगला आला विकेटकीपर अजय रात्रा. नयन मोंगियानंतर अनेक विकेटकीपरचे पर्याय टीम इंडियाने तपासून पाहिलेले. मात्र, तितकं यश कोणालाही मिळाले नव्हतं. हा रात्राचा सुद्धा टेस्टिंग पिरेड होता. त्यानं आपली टेस्ट एकदम परफेक्ट दिली. अनुभवी लक्ष्मणसोबत तो खेळपट्टीला चिकटला. 217 रन्सची पार्टनरशिप केली. दोघांनीही शतक पूर्ण करत टीम इंडियाला 513 पर्यंत नेले. रात्रा 115 रन्स करत नॉट आऊट राहिला. टीम इंडियाची बॅटिंग अडीच दिवस चाललेली.
मॅच ड्रॉकडे चालली आहे असा विचार करून वेस्ट इंडीजने सुरुवातीपासूनच कासवगती पकडली. हिंड्स व सरवान यांनी फिफ्टी केली. टीमची गरज लक्षात घेऊन अनिल कुंबळे तुटका जबडा घेऊन बॉलिंगला आला. ग्राऊंडवर त्याला स्टॅंडिंग ओवेशन मिळाली. एका एंडवरून सलग 14 ओव्हर टाकत त्याने ब्रायन लाराला आऊट केले. त्यानंतर मात्र कॅप्टन कार्ल हूपर व शिवनारायण चंद्रपॉल यांनी नांगर टाकला. हूपरने 278 बॉलमध्ये 136 रन्स केल्या. त्यानंतर आलेल्या विकेटकीपर रिडले जेकबने वेगवान शतक ठोकले. टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात दोन्ही संघाच्या विकेटकीपरने शतक करण्याची ती पहिलीच वेळ होती.
मॅचचा पाचवा दिवस होता आणि निकाल लागण्याची शक्यता केव्हाच संपलेली. इथे टीम इंडियाच्या कधी न बॉलिंग करणाऱ्या बॉलर्सने बॉल हातात घेतला. व्हीव्हीएस लक्ष्मण, राहुल द्रविड, वसीम जाफर आणि शिवसुंदर दास यांनी बॉलिंग केली. लक्ष्मणने 17 ओव्हर टाकत आपली पहिली विकेट मिळवली. द्रविडने सेंचुरियन जेकब्सला आउट करत आपल्या टेस्ट करिअरमधील पहिली विकेट मिळवली. त्याहून भारी स्पेल होता वासिम जाफरचा. त्याने 11 ओव्हरमध्ये 2 विकेट्स मिळवल्या. तो त्या इनिंगमधील टीम इंडियाचा सर्वात यशस्वी बॉलर होता. आठ ओव्हर टाकणाऱ्या दासला मात्र विकेट मिळाली नाही. दहा जणांनी बॉलिंग टाकली मग विकेटकीपर असलेल्या अजय रात्राला राहवले नाही. ग्लोव्हज राहुल द्रविडकडे देत 247 वी ओव्हर त्याने टाकली. याचबरोबर भारत सर्व 11 बॉलर्स वापरणारा तिसरा संघ बनला. यानंतर आणखी एक ओवर टाकून मॅच थांबवली गेली.
दोन्ही टीम्सने केलेली यथेच बॅटिंग प्रॅक्टिस, अजय रात्राची पहिली सेंचुरी, कुंबळेची जिगर, चंद्रपॉलची 504 बॉलमधील 136 रन्सची नॉट आऊट इनिंग आणि टीम इंडियाच्या सर्व बॉलर्सनी केलेली बॉलिंग या सर्व गोष्टींसाठी ही टेस्ट नेहमी लक्षात राहील.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
क्रिकेटच्या 145 वर्षांच्या इतिहासातील दुर्मिळ योगायोग, भारतीयांनाही लावलाय नंबर; एका क्लिकवर घ्या जाणून
‘त्या’ वर्ल्डकपपासून दक्षिण आफ्रिकेवर लागला चोकर्सचा शिक्का, खेळाडू स्वप्नातही विसरणार नाहीत