क्रिकेट असा खेळ आहे ज्यामध्ये तुम्हाला मैदानावर बऱ्याच वेळा वातावरण गरम झालेले दिसते. स्लेजिंग ही वरचेवर होत असते. मात्र, हे केवळ मैदानापुरतेच मर्यादित राहते. एकदा मैदानाबाहेर गेल्यावर हेच विरोधी खेळाडू गळ्यात गळे घालून भेटतात. इम्रान खान आणि सुनील गावसकर यांच्या मैत्रीचे किस्से आजही प्रसिद्ध आहेत. एक जिंदादिल व्यक्ती म्हणून इम्रान खान यांना ओळखले जाते. गावसकरांइतकेच इम्रान यांचे दुसरे घनिष्ठ मित्र आहेत ऑस्ट्रेलियाचे वर्ल्डकप विनिंग कॅप्टन सर ऍलन बॉर्डर. आजच्या या लेखामध्ये त्याच इम्रान खान व ऍलन बॉर्डर यांच्यातील एक किस्सा आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
इम्रान खान (Imran Khan) म्हणजे 70-80च्या दशकातील सर्वोत्कृष्ट ऑलराऊंडर्सपैकी एक. कपिल देव आणि इयान बॉथम यांच्यासोबत महानतेच्या बाबतीत त्यांची स्पर्धा झाली. याच इम्रान यांनी पाकिस्तानचा एक धोकादायक संघ बनवला. असा संघ जो जगातील कोणत्याही मजबूत संघाला मात देण्यासाठी ओळखला जायचा. पुढे 1992ला पाकिस्तानचे वर्ल्डकप विजयाचे स्वप्न साकार करून त्यांनी थांबण्याचा निर्णय घेतला. क्रिकेटसाठी कार्य केले आणि पुढे पाकिस्तानचे पंतप्रधानही झाले.
दुसरीकडे ऍलन बॉर्डर. खडूस ऑस्ट्रेलियन्सची परंपरा पुढे नेणारे खेळाडू. डॉन ब्रॅडमन आणि ग्रेग चॅपेल यांच्यानंतर बरेचसे रेकॉर्ड त्यांनी आपल्या नावावर केले होते. 70-80च्या दशकांत ऑस्ट्रेलियन बॅटिंग लाईनअपची धुरा समर्थपणे त्यांनी पेलली. 1975मध्ये पहिल्या वर्ल्डकप फायनलमध्ये हरलेल्या ऑस्ट्रेलियाला बरोबर 12 वर्षानंतर त्यांनीच वर्ल्डकप जिंकून दिला, असे हे दोन्ही दिग्गज मित्र.
सन 1983-1984चा काळ होता. पाकिस्तान टीम ऑस्ट्रेलिया टेस्ट सीरिज खेळायला गेली होती. अपेक्षेच्या विपरीत पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाला चांगली लढत दिली. पाच टेस्टपैकी चार टेस्ट झालेल्या आणि त्यातील फक्त एक टेस्ट ऑस्ट्रेलियाने जिंकली होती. शेवटची टेस्ट होणार होती सिडनीत. त्यावेळी खेळाडूंवर आतासारखी बंधने नसायची. खेळाडू मनसोक्त फिरायचे, भेटायचे. चौथ्या टेस्टनंतर दोनच दिवसांचा वेळ होता. अशात इम्रान आणि बॉर्डर या दोन्ही दोस्तांनी भेटायचं ठरवलं. सिडनीतील एका कॅफेत अनौपचारिक गप्पांसाठी ही भेट होणार होती.
दोघांची भेट झाली आणि कॉफी घेत घेत गप्पा सुरू झाल्या. त्यावेळी क्लाईव्ह लॉईड यांची वेस्ट इंडीज टीम सर्वात मजबूत होती. टेस्ट आणि वनडे दोन्ही प्रकारात त्यांचे वर्चस्व. नेमका त्याच वर्षी वर्ल्डकप व्हायचा होता. कोणता संघ कसा? कोणाचे जिंकण्याचे चान्स किती या गोष्टींवर चर्चा झाली. पुन्हा चर्चेचा सूर दुसऱ्या दिवशी होणाऱ्या टेस्टकडे वळाला. इम्रान बोलता बोलता म्हणाले,
“एबी आम्हाला सुनील गावसकर आणि चंद्रशेखर मिळाला ना, तर आम्ही ऑस्ट्रेलियाला सहज हरवू.”
त्यावेळी सुनील गावसकर म्हणजे जगातील सर्वोत्तम बॅटर होते. जगातील सगळ्या मैदानांवर त्यांनी अधिराज्य गाजवलेले. दुसरीकडे चंद्रशेखर यांची स्पिन खेळायला भलेभले कचरायचे. याच कारणांमुळे इम्रान यांनी हे वक्तव्य केलेले.
त्यांचे हे वाक्य ऐकून बॉर्डर यांनी स्मितहास्य केले. काही क्षण थांबून ते म्हणाले,
“आम्हाला फक्त दोन पाकिस्तानी अंपायर द्या, आम्ही जग जिंकून दाखवतो.”
त्यावेळी पाकिस्तानी अंपायरर्सची जगभरात प्रतिमा अत्यंत डागाळलेली होती. पाकिस्तानी अंपायर नेहमी आपल्या संघाला झुकते माप देतात, असा आरोप त्यांच्यावर व्हायचा. शाकूर राणा, नजर मोहम्मद हे त्या वेळचे कुप्रसिद्ध पाकिस्तानी अंपायर होते. बॉर्डर यांनी हे वक्तव्य गमतीत केले. मात्र, इम्रान यांना ते चांगलेच झोंबले. त्यांनी त्या कॅफेमध्येच बॉर्डर यांच्याशी वाद घालायला सुरुवात केली. या वक्तव्यावर माफी मागा असा सूर त्यांनी आवळला. बॉर्डर यांनी तिथे माफी मागितली आणि ते बाहेर आले.
इतके होऊनही इम्रान यांचा राग शांत झाला नव्हता. त्यांनी थेट पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडे याची तक्रार केली. पाकिस्तान क्रिकेट बोर्डानेही प्रकरण लावून धरले. बॉर्डर यांनी गमतीत म्हटलेले शब्द पाकिस्तानच्या जिव्हारी लागलेले. ते बॉर्डर यांच्या सार्वजनिक माफीवर अडून बसले. प्रकरण जास्त तापू नये म्हणून क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बॉर्डर माफी मागायला लावली. प्रकरण मिटले.
पुढे ऑस्ट्रेलियाने सिडनी टेस्ट जिंकून सीरिज आपल्या नावे केली. इतक्या स्पर्धात्मक वातावरणात झालेली ती सीरिज त्या एका प्रकरणामुळे कायमची आठवणीत राहिली. मात्र, त्या अनौपचारिक गप्पांतील दोन्ही दिग्गजांच्या मागण्या काही कधीच पूर्ण झाल्या नाहीत!
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अबब! सामना शुल्क सारखे, तरीही विराट-रोहितच्या वार्षिक पगाराच्या तुलनेत स्मृती-हरमनचा पगार झोप उडवणारा
विश्वचषकाच्या फायनलमध्ये भारतीय गोलंदाजी फोडण्यासाठी पाँटिंगने वापरलेली स्प्रिंगवाली बॅट? खरं घ्या जाणून