भारतीय क्रिकेट संघाला आजपर्यंत अनेक नावाजलेले क्रिकेटपटू प्रशिक्षक म्हणून मिळाले आहेत. त्यातीलच एक नाव म्हणजे ग्रेग चॅपेल. भारतीय संघाचे प्रशिक्षक असताना चॅपेल यांचे नाव अनेक वादांमुळेच अधिक चर्चेत राहिले. नुकतेच माजी भारतीय क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी चॅपेल यांनी व्हीव्हीएस लक्ष्मणला कसे फटकारले होते, याबद्दल खुलासा केला आहे.
मांजरेकरांनी सांगितले की हा किस्सा झिम्बाब्वे दौऱ्यातील एका कसोटी सामन्यादरम्यानचा आहे. त्यांनी स्पोर्ट्सकिडाशी बोलताना सांगितले की ‘हरारेमध्ये एक कसोटी सामना सुरु होता. ग्रेग चॅपेल काही राखीव क्षेत्ररक्षकांसह सराव सत्रासाठी गेले होते. ३०-४० मिनिटानंतर जेव्हा ते ड्रेसिंग रुमकडे परत येत होते, तेव्हाच त्यांनी पाहिले की एक बदली क्षेत्ररक्षकाने स्लीपमध्ये झेल सोडला आहे. त्यावेळी त्यांना आश्चर्य वाटले की मैदानावर बदली क्षेत्ररक्षक का आहे आणि कोणता खेळाडू बाहेर गेला आहे.’
मांजरेकरांनी पुढे सांगितले की ‘जेव्हा ग्रेग चॅपेल आत आले तेव्हा त्यांनी पाहिले की लक्ष्मण कॉफी पीत आहे. त्यावर चॅपेल नाराज झाले आणि त्यांनी तो मैदानात का नाही, असे विचारले. त्यावर लक्ष्मणने सांगितले की त्याला दुखापत झाली आणि म्हणून तो बर्फाने शेकण्यासाठी मैदानातून बाहेर आला. त्यावर चॅपेल यांनी विचारले की ती दुखापत गंभीर होती का? हे ऐकून लक्ष्मण आर्श्चर्यचकीत झाला. त्यांनी सांगितले की जर जखम गंभीर नसेल तर मैदानातून कधीही बाहेर यायचे नाही. बदली खेळाडू ही अशी एक गोष्ट आहे जी भारतीय संघाबरोबर अन्य संघांबरोबर होत असते. पण ग्रेग चॅपेल यांना हे कधीही आवडले नाही.’
चॅपेल हे २००५ ते २००७ पर्यंत भारतीय संघाचे प्रशिक्षक होते. याच काळात त्यांच्यातील आणि सौरव गांगुलीमधील वादाचे प्रकरण गाजले होते. तसेच याच काळात गांगुलीला भारतीय संघातील स्थानही गमवावे लागले होते. केवळ गांगुलीच नाही तर त्यावेळीच्या भारतीय संघातील इतर खेळाडूंनीही चॅपेल यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने त्याच्या आत्मचरित्रामध्ये चॅपेल यांचे ‘रिंगमास्टर’ अशा शब्दात वर्णन केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
तेव्हा सचिनच्या आईने पाहिला होता सचिन खेळलेला पहिला आंतरराष्ट्रीय सामना
घरी पैसे नसल्याने आईने स्वत: शिवले होते पुजारासाठी बॅटिंग पॅड; त्यागाची कहाणी आहे अतिशय भावनिक