दाऊद इब्राहिम. एक असं नाव जे लहानपणापासून आपल्या सर्वांच्या कानावर पडत आलेय. त्याचे काही मोजकेच फोटो आपण पाहतो. गुन्हेगारी असो, राजकारण असो, बॉलीवूड असो नाहीतर क्रिकेट असो दाऊद इब्राहिम या नावाचा उल्लेख येतोच. दाऊद इब्राहिम १९९३ मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील मोस्ट वॉन्टेड आणि नंबर एकचा आरोपी. असे असले, तरी या विविध क्षेत्रात त्याची चर्चा कायम असते. भारतातील याच सर्वात कुप्रसिद्ध व्यक्तीचा एकदा टीम इंडियाचे पहिले वर्ल्डकप विनिंग कॅप्टन कपिल देव यांच्याशी आमना-सामना झाला होता. त्यानंतर जे काही घडले त्याची ही कहाणी.
खरंतर ज्या घटनेविषयी हा लेख आहे त्याविषयी वेगवेगळे संदर्भही दिले जातात. मात्र, ही घटना घडली होती हे नक्की, तर या घटनेचे दोन मुख्य किरदार आहेत अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि द कपिल देव. शारजामध्ये १९८६ ला झालेला ऑस्ट्ल-एशिया कप साऱ्यांनाच माहीत असेल. लास्ट बॉलवर जावेद मियांदादने चेतन शर्माला छक्का मारून पाकिस्तानला जिंकून दिलेली टुर्नामेंट. त्या फायनलच्या आधी एक दिवस दोन्ही टीम्स शारजाच्या ग्राउंडवर प्रॅक्टिसला होत्या. पाकिस्तान सकाळच्या सेशनमध्ये आणि टीम इंडिया दुपारच्या सेशनमध्ये प्रॅक्टीस करणार होती. त्याच वेळी दोन्ही टीमचे कॅप्टन कपिल देव आणि इम्रान खान प्रेस कॉन्फरन्स घेणार होते. कपिल प्रेस कॉन्फरन्सला गेले आणि टीम इंडिया सरावात मग्न झाली.
शारजात ४० डिग्रीच्या तापमानात सराव करून टीम इंडियाचे प्लेयर ड्रेसिंग रुममध्ये विश्रांती घेत होते. श्रीकांत, गावसकर, वेंगसरकर, कीर्ती आझाद हे भारतीय प्लेअर्स ड्रेसिंग रूममध्ये बसले होते, तेव्हा दोन गृहस्थ ड्रेसिंग रूममध्ये पोहोचले. त्या काळात शारजा क्रिकेट स्टेडियममधील ड्रेसिंग रूममध्ये जाणं म्हणजे सामान्य नव्हेतर अतिसामान्य होतं. आतासारखं त्यावेळी अँटिकरप्शन वाले ड्रेसिंग रूमच्या आसपास नसायचे. अशात इंडियाच्या रूममध्ये आलेल्या पैकी एक जण होता त्यावेळेचा सुपरस्टार कॉमेडीयन मेहमूद.
हेही पाहा- जेव्हा दाऊद इब्राहिम घुसलेला भारताच्या ड्रेसिंगरूममध्ये
ड्रेसिंग रूममध्ये मेहमूद यांना सारेच ओळखायचे. मात्र, त्या दुसऱ्या व्यक्तीला कोणीही ओळखले नाही. स्वतः मेहमूद पुढे आले आणि त्यांनी म्हटले, “हे माझे मित्र आहेत. आपल्या मुंबईचेच आहे, पण इथे व्यवसाय करतात. त्यांना तुम्हाला काहीतरी ऑफर द्यायचीय.” सारे प्लेयर्स एकमेकांकडे पाहू लागले. दाऊद इब्राहिमने बोलायला सुरुवात केली. त्याने आपलं नाव सांगितलं नाही. तो फक्त म्हणाला, “मित्रांनो मी तुमच्यासाठी ऑफर घेऊन आलोय. उद्या पाकिस्तान विरुद्धची मॅच तुम्ही जिंकला तर, मी प्रत्येकाला टोयोटा कोरोला कार भेट देईल.” सर्वांनी एकमुखाने त्याला नकार दिला. तिथे दाऊदला फक्त एका व्यक्तीने ओळखले ती व्यक्ती म्हणजे दिलीप वेंगसरकर. कारण वेंगसरकर देखील मुंबईचेच.
दाऊद पुढे काही बोलणार इतक्यात कपिल देव प्रेस कॉन्फरन्स संपवून ड्रेसिंग रूममध्ये आले. त्यांनी मेहमूद यांना ओळखले. कपिल देव यांना खरंतर मेहमूद यांचे ड्रेसिंग रूममध्ये येणे आवडले नव्हते. ते म्हणाले, “मेहमूद भाई टीम मीटिंग होनेवाली है आप बाहर जाईए.” तेवढ्यात त्यांना समोर दाऊद दिसला. कपिल देव यांनी त्याला कधी पाहिलेच नसल्याने त्यांनी सरळ अरेतुरे करत, “यह कौन है? चल बाहर चल.” दाऊद एक अक्षरही न बोलता तिथून निघाला. मात्र, दारापाशी थांबत म्हणाला, “कार कॅन्सल हा.” पुढे कपिल यांना समजले की, आपण बाहेर काढलेला व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून मुंबईमधील डॉन आणि स्मगलर दाऊद इब्राहिम होता.
या प्रकरणाचा सार्वजनिकरीत्या खुलासा दिलीप वेंगसरकर यांनी केला होता. तसेच, टीम इंडियाचे बराच काळ मॅनेजर राहिलेल्या जयवंत लेले यांनीदेखील आपल्या आत्मचरित्रात या घटनेचा उल्लेख केलेला. रवी शास्त्री, मनिंदरसिंग यासारखे माजी क्रिकेटर कबूल करतात की, दाऊद शारजामध्ये होणारी प्रत्येक मॅच पाहायला असायचा. इतकच कायतर मॅचनंतरच्या प्रत्येक पार्टीत दाऊद हजर राहायचा.
पुढे १९९३ ला मुंबई ब्लास्टमध्ये दाऊद मोस्ट वॉंटेड क्रिमिनल बनला. पाकिस्तान आणि युएईत त्याने आश्रय घेतला. १९९९ च्या मॅच फिक्सिंग प्रकरणातही त्याचं नाव आलं. तीन दशके लोटली पण दाऊद अजूनही भारतात आला नाही. तो शेवटचा दिसला तोही शारजा क्रिकेटच्या ग्राऊंडवरच. पिवळा टी शर्ट घालून फोनवर बोलताना.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारतरत्न! ‘हे’ ४ भारतीय खेळाडू होऊ शकतात देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित
चल हवा येऊ दे! रूडचा मूड ऑफ करत नदालने पुन्हा दाखवून दिले, ‘आपणच आहोत लाल मातीचे बादशाह’