कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २५ जून १९८३ ला पहिल्यांदा विश्वचषक जिंकत इतिहास रचला. भारताने त्यावेळेच्या क्लाईव्ह लॉईडच्या नेतृत्वाखालील खेळणाऱ्या बलाढ्य वेस्ट इंडिज संघाचा पराभव करत विश्वचषक जिंकला होता. त्यावेळी भारताला २०००० पाऊंड्स बक्षीस रक्कम मिळाली होती.
मात्र सध्याच्या परिस्थितीप्रमाणे बीसीसीआय त्याकाळी श्रीमंत क्रिकेट बोर्ड नव्हते. बीसीसीआयची अर्थिक परिस्थिती फारशी बरी नव्हती. त्यामुळे त्यांना विश्वचषक विजेत्या भारतीय खेळाडूंना बक्षीस म्हणून मानधन देता येत नव्हते.
त्यामुळे भारतरत्न लता मंगेशकर बीसीसीआय आणि खेळाडूंच्या मदतीसाठी पुढे आल्या होत्या. खेळाडूंना मानधन देण्यासाठी बीसीसीआयचे तत्कालीन अध्यक्ष एनकेपी साळवे यांनी लताजी यांना मैफलीचे आयोजन करण्याची विनंती केली होती. त्यांच्या विनंतीला मान देत दिल्लीतील इंद्रप्रस्त स्टेडियमवर लता मंगेशकरांनी गायन केले. या कार्यक्रमातून २० लाख रुपयांचा नीधी गोळा झाला. त्यामुळे विश्वविजेत्या भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूला १ लाख रुपये मानधन देण्यात आले होते.
दिल्लीमध्ये केलेल्या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे ‘भारत विश्वविजेता’ हे गाणे हृदयनाथ मंगशकरांनी संगीतबद्ध केले होते. तसेच प्रसिद्ध गीतकार इंदिवर यांनी विजयी संघासाठी लिहिले होते. हे गाणे लता मगंशकरांनी जेव्हा गायले तेव्हा विश्वचषक विजेत्या भारतीय संघातील प्रत्येक सदस्याने कोरस दिला होता.
याहू क्रिकेट वरील माहितीप्रमाणे, लता मंगेशकर भारताने विश्वचषकाचे विजेतेपद जिंकले तेव्हा लॉर्ड्सच्या मैदानात उपस्थित होत्या. तसेच विश्वचषकाच्या अंतिम सामन्याआधी त्यांनी भारतीय संघाला जेवणासाठीही आमंत्रण दिले होते आणि अंतिम सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. विशेष म्हणजे भारताने विश्वचषक जिंकल्यानंतर कर्णधार कपिल देव यांनी लताजींना लंडनमध्ये भारतीय संघाबरोबर जेवणसाठी आमंत्रण दिले होते.
दोन दशकांनंतर २००३ मध्ये बीसीसीआयने लता मंगेशकरांच्या पुण्यातील रुग्णालयासाठी निधी गोळा करण्यासाठी सामन्याचे आयोजन करून त्यांचे ऋण फेडले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
भारताने ५ व्यांदा जिंकला १९ वर्षांखालील विश्वचषक, पाहा आत्तापर्यंतच्या विश्वविजेत्यांची संपूर्ण यादी
यश धूलच्या रुपात भारताला मिळाला पाचवा युवा विश्वविजेता कर्णधार, पाहा संपूर्ण यादी
भारतीय दिग्गजाने बनविली ऑल-टाईम U19 टीम; भारताच्या केवळ एका खेळाडूचा समावेश