रॉबिन उथप्पा हा २०१०च्या दशकातील भारताच्या काही दर्जेदार युवा खेळाडूंपैकी एक होता. स्थानिक क्रिकेटमधील दमदार कामगिरीनंतर त्याला भारताच्या राष्ट्रीय संघात स्थान मिळाले. मात्र नंतर त्याला फार काळ हे स्थान टिकवता आले नाही. पुरेशा सातत्याने संधी न मिळाल्याने म्हणा किंवा सातत्यपूर्ण कामगिरीच्या अभावामुळे म्हणा, त्याला भारतीय संघात दीर्घकाळ खेळता आले नाही, हे मात्र खरे.
मात्र असे असले तरी स्थानिक क्रिकेट आणि आयपीएलमध्ये त्याने कायमच दमदार कामगिरी केली. आयपीएल मध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि रायझिंग पुणे सुपरजायंट्स या दोन संघाकडून खेळतांना त्याने शानदार प्रदर्शन केले. मागील दोन हंगामात तो राजस्थान रॉयल्स संघाचा भाग होता. तर यंदाच्या हंगामात त्याला एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जने आपल्या ताफ्यात सहभागी करुन घेतले होते. उथप्पा हा धोनीच्या फलंदाजीचा आणि नेतृत्वाचा मोठा चाहता आहे. अनेकदा धोनीची खासियत अधोरेखित करणारे किस्से तो सांगत असतो. असाच एक किस्सा त्याने नुकताच उलगडला. यात त्याने धोनीने एकदा इंग्लंडचा माजी फलंदाज केव्हिन पीटरसनची कशी बोलती बंद केली होती, ते उलगडले.
धोनीने पीटरसनची केली बोलती बंद
रॉबिन उथप्पाने आयपीएल दरम्यानचा एक किस्सा उलगडला, जेव्हा धोनीने त्याला स्लेजिंग करू पाहणार्या पीटरसनची बोलती बंद केली होती. त्याचे झाले असे होते की २०११ साली इंग्लंडमध्ये भारतीय संघ इंग्लंडशी एक कसोटी सामना खेळत होता. यात एमएस धोनी गोलंदाजी करत असतांना एका चेंडूवर केव्हिन पीटरसन बाद असल्याची अपील झाली आणि पंचांनी देखील ती मान्य केली. त्यामुळे धोनीला पीटरसनची विकेट मिळाली, असेच वाटले होते. मात्र त्यानंतर पीटरसनने रिव्ह्यू घेतला, ज्यात तो बाद नसल्याचे स्पष्ट झाले.
या किश्श्याची आठवण धोनीने आयपीएलच्या एका सामन्यात पीटरसनला करून दिली होती. त्यावेळी समालोचन कक्षातील समालोचक रायझिंग पुणे सुपरजायंट्सचा खेळाडू मनोज तिवारीशी सामना चालू असतांना संवाद साधत होते. त्यावेळी पीटरसनने मनोज तिवारीला निरोप दिला की धोनीला सांग, मी त्याच्यापेक्षा अधिक चांगला गोल्फ खेळतो. मनोज तिवारीने हा निरोप देताच धोनीने तात्काळ प्रत्युत्तर दिले. “त्याला (पीटरसन) म्हणावं, अजूनही तो माझी पहिली टेस्ट विकेट आहे, त्यामुळे शांत राहा”, अशा शब्दांत धोनीने उत्तर देत पीटरसनची बोलती बंद केली होती. धोनीच्या या मजेशीर उत्तरानंतर समालोचकांनाही हसू आवरता आले नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
सुशीलआधी या सहा ऑलिंपियनने भोगलाय तुरुंगवास; सुवर्णपदक विजेत्यांचाही समावेश
दम लगाके हैशा! रिषभ पंतने ‘या’ व्यक्तीला दाखवला आपला दम; उचलून फिरवले गरगर
बक्कळ पैसा! पाकिस्तानच्या प्रशिक्षकापेक्षा पाच पट कमावतात शास्त्री, बघा इतर प्रशिक्षकांची पगार