२०१६ साली आलेला वरूण धवन आणि जॉन अब्राहम यांची भूमिका असलेला ‘ढिशुम’ चित्रपट आठवतोय का? भारत-पाकिस्तान दरम्यान आखाती देशात होणाऱ्या अंतिम सामन्यापूर्वी भारताचा स्टार फलंदाज विराज शर्मा अचानक गायब होतो अशीच सुरूवात होती ना? आणि खरच असे झाले तर?
एकदम फिल्मी असलेली ही कल्पना या चित्रपटाआधीच सत्यात उतरलीय. होय, अशीच घटना एका आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू सोबत घडली आहे. पाकिस्तानचा यष्टिरक्षक-फलंदाज झुल्करनैन हैदर (Zulqarnain Haider) हे त्या खेळाडूचे नाव.
आईचे स्वप्न-
झुल्करनैनच्या आईचे एक स्वप्न होते. तिच्या चार मुलांपैकी एकाने तरी पाकिस्तानी जर्सी घालून देशाचे प्रतिनिधित्व करावे. झुल्करनैन पाकीस्तानच्या १५ वर्षांखालील संघासोबत इंग्लंडच्या दौऱ्यावर गेला पण त्याची आई त्याला पाकिस्तानी जर्सीमध्ये पाहू शकली नाही. तो परत येई पर्यंत त्याची आई निवर्तली होती.
आई गेली पण तिचे स्वप्न झुल्करनैन जगत होता. २००४ च्या १९ वर्षांखालील विश्वविजेत्या पाकिस्तानी संघाचा तो सदस्य होता. सहा वर्षे वाट पाहिल्यानंतर झुल्करनैन पाकीस्तानच्या राष्ट्रीय संघात निवडला गेला. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून तो पदार्पणासाठी सज्ज झाला. आईचे स्वप्न पूर्ण होत होते.
कारकीर्द-
पदार्पणाचा सामना झुल्करनैनसाठी म्हणावा तसा चांगला गेला नाही. पाकिस्तानच्या ३६ धावांवर ५ विकेट गेल्या असताना झुल्करनैन फलंदाजीसाठी आला आणि स्टुअर्ट ब्रॉडच्या गोलंदाजीवर मॅट प्रायरच्या हाती पहिल्याच चेंडूवर झेल देत परतला. त्या डावात पूर्ण पाकिस्तानी संघ ७२ धावात सर्वबाद झाला. दुसऱ्या डावात मात्र झुल्करनैनने एकहाती खिंड लढवत ८८ धावा केल्या. ब्रॉडचा एक थ्रो झुल्करनैनच्या हातावर लागल्याने त्याला मालिकेतून बाहेर पडावे लागले. पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव झाला.
दुखापतीतून सावरल्यानंतर त्याच वर्षी ऑक्टोबरमध्ये द. अफ्रिकेविरूद्धच्या मालिकेसाठी त्याची पाकिस्तानच्या एकदिवसीय संघात वर्णी लागली. मालिकेच्या पहिल्या तीन सामन्यात झुल्करनैनने फक्त १२*, ६, ११ अशा धावा केल्या. चौथा सामना पाकिस्तान आणि झुल्करनैन दोघांसाठी महत्त्वाचा होता. २७४ धावांचा पाठलाग करताना झुल्करनैनने १९ धावांची खेळी करून पाकिस्तानला एक विकेटने रोमहर्षक विजय मिळवून दिला. मालिका बरोबरीत आली होती. झुल्करनैन एका सामन्याने ‘हिरो’ झाला होता. अखेरचा निर्णायक सामना ८ नोव्हेंबर रोजी दुबईमध्ये होणार होता. सकाळी टीम मैदानाकडे निघाली तेव्हा झुल्करनैन संघासोबत नव्हता.
७ नोव्हेंबरच्या रात्री उशिरा आल्याबद्दल झुल्करनैन, अब्दुर रहमान व शाहबाज हसन यांना ५०० दिरहमचा दंड केला होता. अनेकांना वाटले त्या रागातच तो इकडेतिकडे गेला असेल. कर्णधार शाहिद आफ्रिदीने, तो आराम करतोय असे उत्तर दिले तर प्रशिक्षक वकार युनिस मॅनेजर याचे उत्तर देईल असे सांगून सामन्यासाठी रवाना झाले.
काही वेळानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) परिपत्रक काढून सांगितले की, “झुल्करनैन हैदर आज सकाळी कोणाला न सांगता हॉटेलमधुन बाहेर पडला आणि पासपोर्टसोबत असल्याने तो लंडनला जाण्याची शक्यता आहे.”
इकडे, पाकिस्तान अखेरचा सामना हरला. आफ्रिदीने, झुल्करनैनच्या जाण्याने आम्हाला फरक पडत नाही असे सांगत वेळ मारून नेली.
इकडे मीडियामध्ये बातमी पसरली. जो तो आपआपल्या पद्धतीने ती रंगवू लागला. सायंकाळी नक्की झाले की झुल्करनैन लंडनमध्ये आहे. बोर्डाने चौकशी समिती बसविली. समितीला हैदरच्या सदर मालिकेतील खेळाविषयी संशय होता. हैदरने संघ सोडण्याआधी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे,” मी पाकिस्तानी क्रिकेट सोडत आहे. मला मागचा सामना हरण्यासाठी धमकी दिली गेली होती. ” लोकांनी ओळखले की तो चौथ्या सामन्याबाबत बोलतोय. ज्याचा तो स्वतः नायक होता.
झुल्करनैनचे तर्कहीन आरोप-
झुल्करनैनने मॅचफिक्सिंगचे आरोप केले परंतु कोणत्याही खेळाडूचे नाव घेतले नाही फक्त मला मारण्याच्या धमक्या दिल्या हेच तो वारंवार सांगत होता. दरम्यानच्या काळात त्याने निवृत्ती जाहीर केली. ब्रिटनमध्ये आश्रय घेण्यासाठीचे आवश्यक पुरावेदेखील तो देऊ शकला नाही. एका स्थानिक प्रथमश्रेणी सामन्यात फिक्सिंगची गोष्ट त्याने सांगितली. रितसर चौकशी अंती हा आरोप देखील खोटा निघाला. सुरक्षेची हमी घेत २०११मध्ये झुल्करनैन पुन्हा पाकिस्तानमध्ये परतला.
मैदानावर पुनरागमन
२०११च्या मे महिन्यात त्याने आपली निवृत्ती मागे घेतली. देशांतर्गत क्रिकेटमध्ये जराई तरकैती बँक लिमिटेडतर्फे सहभागी झाला. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्याच्याविरुद्ध डिसीप्लीनरी इनवेस्टीगेशन करण्याचे आदेश दिले. काही सट्टेबाज पकडले गेले पण काही तथ्यसमोर आले नाही. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची आचारसंहिता तोडण्यासाठी त्याला पाच लाख पाकिस्तानी रूपयाचा दंड ठोठावला. चौकशी समितीने निकाल दिला की, “झुल्करनैन हैदर याच्याकडे मॅच फिक्सिंगच्या आरोपाचे कोणत्याही खेळाडू किंवा अधिकाऱ्यांविरोधात कसलेही पुरावे नाहीत.” शेवटी झुल्करनैनने लावलेले सर्व आरोप मागे घेतले. २०१४मध्ये शेवटचा प्रथमश्रेणी सामना खेळल्यानंतर तो क्रिकेटपासून कायमचा दूर झाला.
वाचनीय लेख –
…आणि सचिन १९४वर असताना द्रविडने डाव घोषित केला आणि झाला लाखो भारतीयांच्या नजरेत व्हिलन!
किस्से क्रिकेटचे १३- भारत इतिहासातील सर्वात मोठा विजय मिळवत होता, कर्णधार मात्र आराम खुर्चीत…
१६व्या वर्षी कसोटी पदार्पण करत जबरदस्त करियर केलेले ३ क्रिकेटर