मुंबई । भारताचा यष्टिरक्षक फलंदाज महेंद्रसिंह धोनी आयपीएलच्या सर्वच हंगामात एक खेळाडू आणि कर्णधार म्हणून जबरदस्त कामगिरी केली आहे. आयपीएलची सुरुवात होण्यापूर्वी धोनीला खरेदी करण्यासाठी चेन्नई आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर या दोन्ही संघात टक्कर सुरू होती. पण शेवटी चेन्नई सुपरकिंग्सने 1.5 मिलियन डॉलर देऊन आपल्या संघात सामील केले.
इतकी रक्कम देऊन जर धोनी फ्लॉप ठरला तर फ्रेंचायझींना घाटा होऊ शकतो. या भीतीने आरसीबीने त्याला खरेदी केले नाही. म्हणून तो सीएसके च्या संघात गेला, असा खुलासा आरसीबीचे माजी कार्यकारी प्रमुख चारू शर्मा यांनी केला.
धोनी 2008 साली त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम शिखरावर होता. भारतीय संघाने 2007 साली त्याच्याच नेतृत्वाखाली आयसीसी टी-20 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले होते. तरीही आरसीबीने त्याच्या क्षमतेवर संशय व्यक्त करत संघात घेतले नाही. आज धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणारा सीएसकेचा संघ आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ आहे.
चेन्नई सुपरकिंग्सच्या संघाने आतापर्यंत तीन वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. इतकेच नव्हे तर चेन्नई संघाने आयपीएलच्या प्रत्येक मोसमात ‘प्ले ऑफ’मध्ये स्थान मिळवले आहे. धोनीने आतापर्यंत आयपीएलच्या 174 सामन्यात नेतृत्व केले . त्यापैकी 104 सामन्यांमध्ये चेन्नईला विजय मिळवून दिला. 2019 साली झालेल्या आयपीएलच्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने चेन्नईला हरवून विजेतेपद पटकावले.