भारतीय संघात सर्वच खेळाडू नेहमी एकोप्याने राहत असतात, असे सांगितले जाते. एखाद दुसरा रुसवा फुगवा सोडला, तर भारतीय ड्रेसिंग रूममधील वातावरण हलकेफुलके असते. भारतीय क्रिकेटची ही परंपरा सारेच खेळाडू पुढे नेत असतात. त्याला कधीतरी छोटासा छेद बसतो. हा छेद बसण्याचे महत्त्वाचे कारण नाराजी किंवा गैरसमज असते. 1996 चा इंग्लंड दौरा म्हणजे भारतीय संघासाठी एक ऐतिहासिक दौरा. याच दौऱ्यावर भारतीय क्रिकेटला एक नवी पिढी मिळाली. सौरव गांगुली याचं पदार्पणात लॉर्ड्सवर शतक, त्याच इनिंगमध्ये दुसरा पदार्पणवीर राहुल द्रविडने खेळलेली 96 रन्सची इनिंग तसेच व्यंकटेश प्रसाद, पारस म्हांब्रे, सुनील जोशी आणि विक्रम राठोड यांनी याच सीरिजमधून पदार्पण केले. या व्यतिरिक्त त्या सीरिजमध्ये अशी एक घटना घडली, ज्यामुळे भारतीय संघात वाद आहेत, असं म्हटलं जाऊ लागलं. प्रकरण चौकशी समितीपर्यंत गेलं. चौकशी झाली आणि शेवटी एक हलकाफुलका गैरसमज झाल्याचं निष्पन्न झालं. त्याचीच ही कहाणी.
सन 1996 च्या वर्ल्डकपनंतर टीम इंडिया इंग्लंडला तीन टेस्ट खेळण्यासाठी पोहोचली. कपिल देव यांच्याविना हा टीम इंडियाचा पहिला इंग्लंड दौरा होता. संघाचे नेतृत्व पुन्हा एकदा मोहम्मद अझरूद्दीन याच्या हाती होते. बीसीसीआयने एक युवा मात्र मजबूत संघ इंग्लंडला पाठवलेला. टीम इंडिया इंग्लंडला आली आणि सराव सत्रे सुरू झाली. यावेळी इंग्लंडला इंग्लंडमध्ये हरवण्याची सर्वांची इच्छा होती. टीम मीटिंगमध्ये तसे प्लॅनही होत होते. अशात बर्मिंगहॅम येथे पहिली टेस्ट सुरू होण्याच्या दोन आधीच एक धक्कादायक बातमी समोर आली. टीम इंडियाचा अनुभवी ओपनर नवज्योतसिंग सिद्धू कोणालाही पूर्वकल्पना न देता थेट भारतात परत आला होता. काही कौटुंबिक कारणही नव्हते. सिद्धूने भारतात आल्यावर त्याचं कारण दिलं की, कॅप्टन अझरुद्दीनच्या सततच्या शिवीगाळीला कंटाळून मी इकडे आलोय. मला ते सहन होत नव्हते. मीडियानेही हे प्रकरण उचलून धरलं.
इकडे सीरिजला सुरुवात झाली आणि सिद्धूंच्या जागी विक्रम राठोडला पदार्पणाची संधी दिली गेली. टीम इंडियाने मॅच गमावली. इकडे सिद्धू प्रकरणही चांगलंच तापलेलं. चौकशीचं पॅनल स्थापन झालं. पॅनेलमध्ये बीसीसीआयचे तत्कालीन प्रमुख राजसिंग डुंगरपूर, आयएस बिंद्रा, भारताचे माजी कर्णधार यांचा समावेश होता. सुनील गावसकर आणि तत्कालीन बीसीसी सचिव जयवंत लेले पॅनलचे संयोजक होते. प्राथमिक चौकशी केली गेली, तेव्हा सिद्धू काहीही बोलले नाहीत. त्यांनी फक्त हे मान्य केले की, आपली चूक झाली आणि आपण परिणामांना सामोरे जाण्यास तयार आहोत.
इतर लोकांशी आपले कारण शेअर करण्यास सिद्धू कम्फर्टेबल नव्हते. सिद्धू यांना बोलते करण्यासाठी त्यांच्यासारखीच कोणी पंजाबी व्यक्ती हवी, असे सुनील गावसकरांना वाटले. पॅनलमध्ये अशी व्यक्ती आणण्याची त्यांनी मागणी केली. एका सदस्याला हटवून त्यांच्या जागी वर्णी लागली मोहिंदर अमरनाथ यांची. सिद्धू आणि अमरनाथ यांचे मैत्रीपूर्ण संबंध फायदेशीर ठरतील सर्वांना वाटत होते.
तिकडे टेस्ट सीरिजमधील पुढच्या दोन टेस्ट टीम इंडियाने ड्रॉ केल्या. गांगुली, द्रविड आणि प्रसाद यांच्या रूपाने नवे स्टार मिळाले. टीम इंडिया भारतात आली आणि सिद्धू प्रकरणाच्या चौकशीने वेग पकडला. मॅनेजर नागराज, कर्णधार अझरुद्दीन, फिजिओ अली इराणी आणि काही सदस्यांना देखील चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. परंतु सर्वांनी सिद्धूच्या विचित्र वागणुकीच्या कारणांबद्दल अनभिज्ञता व्यक्त केली. सिद्धूची अमरनाथ यांनी दिल्लीत भेट घेतली.
अमरनाथ आणि पूर्ण पॅनलने सर्व साक्षीदारांचे रेकॉर्ड केलेले जबाब ऐकले. त्यातून काहीही साध्य होत नव्हते. अशावेळी राजसिंह डुंगरपूर यांनी अमरनाथ यांना इशारा केला आणि ते सिद्धूला फिरायला म्हणून घेऊन गेले. आता सर्वजण त्यांची वाट पाहत राहिले. वीस पंचवीस मिनिटानंतर दोघेही हसतच आले. सर्वांना थोडंसं हायसं वाटलं. त्यानंतर अमरनाथ यांनी जे सांगितलं ते पाहून सर्वांनाच हसू आलं. सिद्धू यांनी अमरनाथ यांना सांगितलेलं की, “टूरवर गेल्यावर आम्ही रोज भेटायचो, गुड मॉर्निंग वगैरे बोलायचो. मात्र, अझर मला सातत्याने शिवीगाळ करायचे. नेट्समध्ये, हॉटेलमध्ये कोठेही ते शिवीगाळ करायचे. ते म्हणायचे माँ के…”
त्यावर अमरनाथ यांनी सिद्धू यांना समजावले. त्यांनी सांगितले, “आपल्याकडे उत्तर भारतात ही शिवी वाटत असेल. मात्र, हैदराबादमध्ये प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टीवर असा शब्द वापरला जातो. महिलादेखील सर्रास या शब्दाचा वापर करतात. याच्यात राग वगैरे काही मानू नको. अझर तुला दुखावत होता, जाणीवपूर्वक बोलत होता असं काहीही नाही. झाले गेले विसरून जा.”
शेवटी सिद्धू यांना देखील हे म्हणणं पटलं आणि प्रकरण अगदी सहज मिटलं. टीम इंडियाचे मॅनेजर राहिलेल्या व तेव्हा बीसीसीआय सचिव असलेल्या जयवंत लेले यांनी आपल्या ‘आय वॉज देअर- मेमोयर्स ऑफ अ क्रिकेट अॅडमिनिस्ट्रेटर’ या पुस्तकात हा खुलासा केला होता. त्यावेळी टीम इंडियाच्या कॅप्टनवर नाराज असलेला सिद्धू पुढे जाऊन राजकारणात स्थिरस्थावर झाले. मात्र, योगायोगाने इथे देखील एक वेळ अशी आली, जेव्हा राजकारणातील कॅप्टनवरही त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
क्रिकेटच्या इतिहासातील दुर्दैवी घटना! जहाज बुडाल्याने देशाची संपूर्ण क्रिकेट टीम पडलेली मृत्यूमुखी
भारतीय महिला टेनिसच्या क्षितिजावर ‘ऐश्वर्या’च्या रूपात नवीन तारा, कोल्हापूरच्या लेकीची विम्बल्डनपर्यंत मजल





