जेव्हा आपण दूरदर्शनवर किंवा प्रत्यक्ष स्टेडियममध्ये क्रिकेटची मैदाने पाहतो तेव्हा आपसूकच “हिरवे हिरवे गार गालिचे.. ” ही कविता आठवते. एकसारखे कापलेले गवत, वरून त्यावर थोडीफार कल्पकता दाखवून कलाकुसर केली असेल तर ते दृश्य लोभसवाणे असते.
इंग्लंड, ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडमधील मैदाने तर मनमोहकच असतातच. भारतातील वानखेडे स्टेडियम, सवाई मानसिंह स्टेडियम, इकाना स्टेडियम येथील मैदाने देखील डोळ्यांचे पारणे फेडतात. धरमशालाचा तर विषयच वेगळा आहे. रवांडामधील एक स्टेडियमची रचना तर चेंडू बाऊंस झाल्यावर कसा दिसतो, अगदी तशी आहे.
परंतु, याआधी अशी परिस्थिती नव्हती. क्रिकेटला ‘ग्लॅमर’ मिळेपर्यंत मैदानांचे हाल अत्यंत वाईट असत. मैदानांची योग्य काळजी घेतली जात नसत. गवत वाढलेले असते, ज्यादिवशी सामना असेल त्याच्या एक-दोन दिवस आधी ओबडधोबड गवत कापून मैदान खेळण्यासाठी उपलब्ध करून दिली जात. आज आम्ही आपणाला जी घटना सांगत आहोत त्यात, अशाच निकृष्ट दर्जाच्या मैदानात एका छोट्याश्या खिळ्यामुळे एका क्रिकेटरला आपला जीव गमवावा लागला होतो.
१९३७ साली, भारताप्रमाणेच त्रिनिदाद आणि टोबॅगो हा देशदेखील इंग्रजांचा गुलाम होता. १८६९पासूनच त्रिनिदाद आणि टोबॅगोमध्ये प्रथमश्रेणी क्रिकेट खेळण्यास सुरूवात झाली होती. तेथील स्थानिक स्पर्धेला, ‘इंटर कॉलोनियल टुर्नामेंट’ म्हणले जात. त्याच स्पर्धेत एका युवा खेळाडूला प्राणाला मुकावे लागले.
१९०९ मध्ये पोर्ट ऑफ स्पेन येथे जन्मलेला डोनाल्ड एलिगन (Donald Eligon) हे एक वेगवान गोलंदाज होते. १९३४ साली प्रथमश्रेणी पदार्पण करणाऱ्या एलिगन यांना १९३७ पर्यंत फक्त चार सामने खेळायला मिळाले. त्याकाळी स्पर्धात्मक क्रिकेट कमी खेळले जात. एलिगन चार सामन्यांपैकी एक सामना मेरिलबॉर्न क्रिकेट क्लब (MCC) विरुद्ध तर तीन सामने इंटर कॉलोनियल स्पर्धेतील होते.
एलिगन यांनी १९३३-३४ च्या मोसमात दोन सामने खेळत नऊ बळी घेतले तर १९३४-३५ व १९३६-३७च्या मोसमात मिळून नऊ विकेट मिळवल्या. दुर्दैवाने, १९३६-३७ च्या मोसमातील ‘तो’ सामनाच डोनाल्ड एलिगन यांच्यासाठी अखेरचा ठरला. त्या सामन्यातील पहिल्या डावात ६३ धावा देऊन ७ बळी घेत आपले सर्वोत्तम प्रदर्शन केले. दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना मैदानावर पडलेला एक खिळा शूजच्या आरपार जात पायात घुसला.
त्या खिळ्यामुळे त्यांना ब्लड पॉयझनिंगली झाले आणि वेळेवर योग्य वैद्यकीय सुविधा न मिळाल्याने एक युवा वेगवान गोलंदाज आपल्या प्राणाला मुकला.
वयाच्या २८व्या वर्षी ४ सामन्यात १७.७७च्या जबरदस्त सरासरीने या गोलंदाजाने १८ विकेट्स घेतल्या होत्या.
वाचा- …आणि पाकिस्तानच्या संसदेत दिली गेली सचिन बाद झाल्याची बातमी