भारताने एजबॅस्टनवर कसोटी विजय मिळवून इतिहास रचला आहे. शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने इंग्लंडला 336 धावांनी पराभूत करत कसोटी मालिकेत जोरदार पुनरागमन केलं. या ऐतिहासिक विजयानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत शुबमन गिलने मैदानावरील कामगिरीइतकंच आपल्या हाजिरजवाबीनेही सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
गिलने पत्रकार परिषदेत इंग्लंडच्या त्या पत्रकाराचा मुद्दाम उल्लेख केला ज्याने सामन्यापूर्वी भारताच्या एजबॅस्टनवरील खराब विक्रमावरून टोला लगावला होता. गिलने हसत विचारलं, “माझा आवडता पत्रकार कुठे आहे? तो दिसत नाहीये!” उपस्थित सर्व पत्रकार हसले. ही प्रतिक्रिया गिलच्या आत्मविश्वासाचं प्रतिक ठरली.
गिलने यावेळी स्पष्ट केलं की, “मी आधीच म्हणालो होतो की मी इतिहासात किंवा आकडेवारीत विश्वास ठेवत नाही. मागील 50-60 वर्षांत भारत वेगवेगळ्या संघांसह इथे खेळला, पण यंदाची टीम सर्वाधिक मजबूत आहे. आमच्यात विजय मिळवण्याची आणि मालिका जिंकण्याची पूर्ण क्षमता आहे.”
A SAVAGE MOMENT BY CAPTAIN SHUBMAN GILL: [Ankan Kar]
— Johns. (@CricCrazyJohns) July 7, 2025
"I can't see my favourite Journalist, Where is he?". 😂🔥 pic.twitter.com/NbqlQaN2rQ
या सामन्यात भारताने पहिल्या डावात 587 धावा केल्या. ज्यात शुबमन गिलने 269 धावा ठोकल्या, तर जडेजाने 89 आणि यशस्वी जायसवालने 87 धावांची दमदार खेळी केली. इंग्लंडने पहिल्या डावात 407 धावा केल्या. भारताने दुसऱ्या डावात 427 धावा केल्यानंतर इंग्लंडला 608 धावांचे लक्ष्य दिलं. इंग्लंडचा डाव 271 धावांत गुंडाळत भारताने 336 धावांनी विजय मिळवला. मोहम्मद सिराजने पहिल्या डावात 6 आणि आकाश दीपने दुसऱ्या डावात 6 बळी घेतले. गिलला ‘प्लेयर ऑफ द मॅच’ घोषित करण्यात आलं.