महाराष्ट्र प्रिमियर लीगचा तिसरा हंगाम बुधवारी (4 जून) सुरु होत आहे. स्पर्धा सुरू होण्यासाठी 24 तासांपेक्षा कमी अवधी शिल्लक असून, सर्व संघांची तयारी पूर्ण झालेली दिसते. देशातील राज्य क्रिकेट संघटनांच्या टी20 लीगपैकी सर्वात मोठी स्पर्धा असलेल्या या स्पर्धेचे यावेळी मोठ्या व्यासपीठावर थेट प्रक्षेपण होणार आहे.
महाराष्ट्र क्रिकेट संघटना आयोजित करत असलेल्या एमपीएलचा पहिला हंगाम 2023 मध्ये खेळला गेला होता. त्यावेळी या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण डीडी स्पोर्ट्स व फॅनकोड यांनी केले होते. तर दुसऱ्या वर्षी जिओ सिनेमा यांनी स्पर्धा प्रक्षेपित केलेली. स्पर्धेचा तिसरा हंगाम जवळपास 190 देशांमध्ये पाहिला जाईल. जिओ हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर एमपीएल व डब्ल्यूएमपीएल यांचे लाईव्ह स्ट्रीमिंग केले जाईल. तर, टेलिव्हिजनवर हा सामना पाहण्यासाठी स्टार स्पोर्ट्स 2 हा चॅनल निवडावा लागेल.
एमपीएल 2025 ची सुरुवात 4 जून पासून होणार आहे. तर, स्पर्धेचा अंतिम सामना 22 जून रोजी खेळला जाईल. एमपीएलमध्ये सहा संघ खेळताना दिसणार आहे. स्पर्धेच्या पहिल्या दोन हंगामाचे विजेतेपद रत्नागिरी जेट्स संघाने पटकावले होते. तर, प्रथमच होत असलेल्या डब्ल्यूएमपीएलमध्ये एकूण चार संघ सहभागी होतील. यामध्ये रत्नागिरी जेट्स, पुणे वॉरियर्स, सोलापूर स्मॅशर्स व रायगड रॉयल्स यांचा समावेश आहे. पाच जूनपासून सुरू होणारी ही लीग 14 जूनपर्यंत चालेल.
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आ. रोहित पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, एमसीएतर्फे स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी तसेच दोन्ही स्पर्धेसाठी प्रेक्षकांना स्टेडियममध्य मोफत प्रवेश दिला जाईल. मागील दोन हंगामात देखील एमसीएने अशाच प्रकारे क्रिकेटप्रेमींना विनामूल्य स्पर्धा पाहण्याची संधी दिली होती. तसेच, येणाऱ्या चाहत्यांकडून पार्किंगसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क घेतले जाणार नाही. याव्यतिरिक्त सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये येणाऱ्या चाहत्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय केली जाईल.






