भारताचे माजी प्रशिक्षक आणि ऑस्ट्रेलियाचे महान क्रिकेटपटू ग्रेग चॅपेल यांनी मंगळवारी म्हटले की, मोहम्मद सिराज भारतीय गोलंदाजी आक्रमणाचा ‘खरा आणि आत्म्याचा नेता’ बनण्यासाठी तयार आहे. मग जसप्रीत बुमराह संघात असो किंवा नसो.
इंग्लंडविरुद्ध पाचव्या आणि शेवटच्या टेस्टमध्ये भारताला केवळ सहा धावांनी विजय मिळवून देत आणि मालिका 2-2 ने बरोबरीत ठेवण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या मोहम्मद सिराजने शेवटच्या सामन्यात 9 तर संपूर्ण मालिकेत 23 बळी घेतले. त्याने पाच टेस्ट सामन्यांत एकूण 185.3 षटके टाकली.
ग्रेग चॅपेल यांनी ईएसपीएन क्रिकइन्फोसाठी आपल्या कॉलममध्ये लिहिले, ‘‘सांगायचं तर, सिराज याआधीही अनेकदा उत्कृष्ट कामगिरी करत आला आहे. एमसीजी, गाबा, पर्थ, लॉर्ड्स, केपटाउन आणि बर्मिंगहॅमवर. पण ओव्हलवर त्याने जे केलं, ते खरंच अद्भुत होते. बुमराह असो किंवा नसो, सिराज हा गिलच्या नेतृत्वाखालील गोलंदाजी आक्रमणाचा खरा नेता बनण्यासाठी तयार आहे.’’
भारतीय फलंदाजांनी पाच टेस्ट सामन्यांत 12 शतके झळकावली, पण मोहम्मद सिराजची गोलंदाजी सर्वांवर भारी पडली.
चॅपेल यांनी लिहिले, ‘‘इतक्या जबरदस्त फलंदाजी कामगिरीनंतरही, भारत ही मालिका स्पर्धात्मक बनवू शकला, याचे मुख्य श्रेय जर कोणाला जात असेल तर ते मोहम्मद सिराजला. हे म्हणणे चूक ठरणार नाही.’’
ते पुढे म्हणाले, ‘‘त्याच्या कामगिरीपेक्षा मला अधिक प्रभावित केले ते म्हणजे त्याच्यात एक गोलंदाज म्हणून झालेला बदल. त्याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात एक आग्रही गोलंदाज म्हणून केली होती, पण आता तो असा आग्रही गोलंदाज आहे ज्याच्याकडे एक ठाम उद्दिष्टही आहे. आणि हाच फरक असतो एका खेळाडू आणि एका खऱ्या नेतृत्वकर्त्यामध्ये.’’






