आयपीएल 2024 च्या 16 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स समोर कोलकाता नाईट रायडर्सचं आव्हान आहे. विशाखापट्टणम येथील मैदानावर हा सामना खेळला जातोय. कोलकाता नाईट रायडर्सनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
या सामन्यात केकेआरच्या अंगक्रिश रघुवंशीनं धडाकेबाज खेळी खेळली. दिल्लीत जन्मलेल्या 18 वर्षीय रघुवंशीनं रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्ध ‘इम्पॅक्ट प्लेअर’ म्हणून आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं. दिल्लीविरुद्ध त्याला प्लेइंग 11 मध्ये संधी मिळाली, ज्याचं त्यानं सोनं केलं.
फिल सॉल्ट बाद झाल्यावर रघुवंशी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि त्यानं आपल्या खेळीनं सर्वांची मनं जिंकली. त्यानं 27 चेंडूत 5 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीनं 54 धावा ठोकल्या. या डावात त्यानं सुनील नरेनसोबत 104 धावांची भागीदारी करून सामना दिल्लीच्या हातून हिरावून घेतला.
अंगक्रिश रघुवंशीच्या कुटुंबान वयाच्या 11 व्या वर्षी गुडगाव सोडलं आणि ते मुंबईला आले. अंगक्रिशनं यश धुलच्या नेतृत्वाखाली 2022 अंडर-19 विश्वचषक खेळला, ज्यात त्यानं 278 धावा ठोकल्या होत्या. या स्पर्धेत भारत चॅम्पियन बनला होता. अंगक्रिशचा धाकटा भाऊ कृष्णन टेनिसपटू आहे. त्याला लहान असताना ब्लड कॅन्सर झाला होता. तेव्हा अंगक्रिश त्याच्यासोबत हॉस्पिटलमध्ये झोपायचा.
अंगक्रिशची आई मलिका रघुवंशी यांनी ‘इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना सांगितलं की, “ती पाच वर्ष सर्वात भयानक होती. त्यानं (अंगक्रिश) आपल्या लहान भावाला कधीही एकटं सोडलं नाही. लहान भावाच्या उपचारादरम्यान तो मानसिकदृष्ट्या कणखर झाला.”
रघुवंशीनं 2023 मध्ये मुंबईसाठी लिस्ट ए आणि टी 20 मध्ये पदार्पण केलं. त्यानं सीके नायडू ट्रॉफीमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन केलं, जिथे त्यानं नऊ सामन्यांमध्ये 765 धावा ठोकल्या. कोलकाता नाईट रायडर्सनं त्याला लिलावात खरेदी केलं. येथे त्याचे बालपणीचे प्रशिक्षक अभिषेक नायर सपोर्ट स्टाफचे सदस्य आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
कोण आहे ऋषभ पंतची रूमर्ड गर्लफ्रेंड? अनेक वर्षांपासून आहेत दोघं रिलेशनशिपमध्ये
याच्या गोलंदाजीत हेल्मेटमुळे वाचला अनेकांचा जीव! जाणून घ्या, कसा घडला वेगाचा बादशाह मयंक यादव