---Advertisement---

T20 WC26: न्यूझीलंडविरुद्ध शतकी खेळी करणारा युवराज समरा नक्की कोण? युवराज सिंगशी आहे खास कनेक्शन

On: मंगळवार, फेब्रुवारी 17, 2026 1:50 PM
---Advertisement---

कॅनडाच्या युवराज सिंग समराने मंगळवारी (१७ फेब्रुवारी) न्यूझीलंडविरुद्धच्या टी२० विश्वचषक २०२६च्या सामन्यात शतकी खेळी करत इतिहास रचला. १९ वर्षाच्या या खेळाडूने न्यूझीलंडच्या मातब्बर गोलंदाजांना चांगलेच धुतले. त्याने ६५ चेंडूत ११० केल्या. त्याने वेगवान गोलंदाज कायले जेमिसनच्या चेंडूवर चौकार मारत आंतरराष्ट्रीय टी२० कारकिर्दीतील त्याचे पहिले शतक पूर्ण केले. हा सामना चेन्नईमध्ये खेळला गेला.

या खेळीमुळे डावखुरा सलामीवीर फलंदाज युवराज टी२० विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात शतक करणारा सर्वात युवा खेळाडू ठरला आहे. त्याचे सध्याचे वय १९ वर्ष १४१ दिवस आहे. याआधी हा विक्रम पाकिस्तानच्या अहमद शहजादच्या नावावर होता. त्याने २०१४च्या स्पर्धेत २२व्या वर्षी शतकी खेळी केली होती. त्याचबरोबर युवराज या स्पर्धेत १०० धावा पूर्ण करणारा पहिला असोसिएट संघाचा खेळाडूही ठरला आहे. या सामन्याआधी त्याने या स्पर्धेत एकही अर्धशतकही केले नव्हते. त्यामुळे त्याने त्याच्या पहिल्या अर्धशतकाचे शतकात रुपांतर केले.

युवराजचे नाव भारताचा दिग्गज अष्टपैलू युवराज सिंगच्या नावाशी जुळणारे आहे. त्याचे वडिल बलजीत सिंग हे युवराज सिंगचे मोठे चाहते आहे. त्यामुळेच त्यांनी त्यांच्या मुलाचे नावही युवराज ठेवले. तसेच ते दोनदा युवराज सिंगला भेटलेही आहेत. २०१९मध्ये टोरंटो नेशनल्स आणि दुसऱ्यांदा २०२५मध्ये सुपर ६०च्या स्पर्धेदरम्यान त्यांनी युवराजची भेट घेतली.

विशेष म्हणजे युवराज सिंगने २०११च्या आयसीसी वनडे विश्वचषकात चेन्नईच्या एमए चिंदबरम स्टेडियममध्ये शतकी खेळी केली होती. त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध ११३ धावा केल्या होत्या. आता त्याच मैदानावर युवराज सिंग समराने ११० धावांची खेळी केली आहे.

युवराज समराने कॅनडासाठी ८ वनडे आणि १९ टी२० सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर कॅनडासाठी सर्वात जलद अर्धशतक करण्याचा विक्रमही आहे. त्याने बहामासविरुद्ध १५ चेंडूत ५० धावा पूर्ण केल्या होत्या.

युवराज समरा टोरंटो डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन आणि ब्रॅम्पटन एंड एटोबिकोक डिस्ट्रिक्ट यांच्याकडून खेळला. त्यानंतर त्याने २०२५मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध कॅनडासाठी लिस्ट एच्या सामन्यात पदार्पण केले. त्याने पहिला आंतरराष्ट्रीय टी२० सामना २०२५मध्ये नामिबियाविरुद्ध खेळला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---