आयपीएलच्या या हंगामात उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेल्या राजस्थान रॉयल्सचा सामना आज दिल्ली कॅपिटल्सशी आहे. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर हा सामना खेळला जातोय.
राजस्थानसाठी हा सामना महत्त्वाचा आहे, कारण आज विजय मिळवताच त्यांचं प्लेऑफचं तिकीट पक्क होईल. या सामन्यात राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन यानं अशा फलंदाजाला पदार्पणाची संधी दिली, ज्याला टी-20 क्रिकेटमधील पुढचा मोठा स्टार म्हटलं जात आहे. या खेळाडूचं नाव आहे डोनावन फरेरा.
दक्षिण आफ्रिकेच्या फरेराला राजस्थाननं लिलावात 50 लाख रुपयांना विकत घेतलं होतं. मात्र त्याची क्षमता पाहिली तर ती त्याला मिळालेल्या रकमेपेक्षा कितीतरी जास्त असल्याचं दिसतं. विशेष म्हणजे त्यानं अनेकदा आपली क्षमता दाखवून दिली आहे.
25 वर्षीय फरेरानं 3 सप्टेंबर 2023 रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला टी20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला. आपल्या पहिल्याच सामन्यात त्यानं ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची दाणादाण उडवून टाकली होती. या सामन्यात सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करायला आलेल्या फरेरानं अवघ्या 21 चेंडूत 48 धावा ठोकल्या होत्या. आपल्या या खेळीत त्यानं 1 चौकार आणि 5 दमदार षटकार लगावले. पदार्पणातच या खेळीनं त्यानं क्रिकेट जगताचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं होतं.
फरेरा साऊथ आफ्रिका टी20 लीगमध्ये जोहान्सबर्ग सुपर किंग्जकडून खेळतो. या संघाचा कर्णधार फाफ डू प्लेसिस आहे. या वर्षी 20 जानेवारीला जोहान्सबर्ग सुपर किंग्सचा सामना प्रिटोरिया कॅपिटल्सशी झाला होता. या सामन्यात फरेरानं तुफानी फलंदाजी करत अवघ्या 18 चेंडूत अर्धशतक ठोकलं. त्यानं 20 चेंडूत 56 धावांची खेळी खेळली, ज्याच्या जोरावर सुपर किंग्ज संघानं दोन षटकांपूर्वीच सामना जिंकला होता.
डोनावन फरेरा जगभरातील अनेक लीगमध्ये जाऊन खेळतो. तो झिम्बाब्वे आफ्रो टी10 लीगमध्येही खेळला आहे. गेल्या वर्षी, तो या लीगमध्ये ‘हरारे हरिकेन्स’कडून खेळला होता. ‘केपटाऊन सॅम्प आर्मी’विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात त्यानं शेवटच्या षटकात 5 चेंडूत 5 षटकार ठोकले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
दिल्लीविरुद्ध संजू सॅमसननं जिंकला टॉस, प्रथम गोलंदाजी करणार; जाणून घ्या प्लेइंग 11
डॅरेल मिशेलनं सरावादरम्यान फोडला चाहत्याचा फोन, मग अशी केली भरपाई; पाहा व्हायरल VIDEO
निवृत्तीनंतर भारतात स्थायिक होणार का? डेव्हिड वॉर्नर म्हणाला, “मी इथे घर…”