आयपीएल 2024 च्या 52 व्या सामन्यात आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू समोर गुजरात टायटन्सचं आव्हान आहे. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात फाफ डू प्लेसिसनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
या सामन्यात गुजरात टायटन्सकडून युवा डावखुरा अष्टपैलू मानव सुथार याला आयपीएलमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. मानव सुथारबद्दल बहुतेक क्रिकेट चाहत्यांना फारशी माहिती नसेल. चला तर मग, या बातमीद्वारे या खेळाडूबद्दल जाणून घेऊया.
मानव सुथार याचा जन्म 3 ऑगस्ट 2002 रोजी राजस्थानमधील गंगानगर जिल्ह्यात झाला. त्याचे वडील शाळेत शिक्षक आहेत. त्यांनीच मानवला क्रिकेट खेळण्याची प्रेरणा दिली. मानवनं वयाच्या 12 व्या वर्षी श्रीगंगानगर क्रिकेट अकादमीमधून क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली. त्याच्या चांगल्या कामगिरीमुळे त्याला श्रीगंगानगर जिल्ह्याचा कर्णधार बनवण्यात आलं. त्यानं अनेक सामन्यांमध्ये संघाला विजय मिळवून दिला आहे.
मानव सुथारनं राजस्थानकडून 16, 19 आणि 23 वर्षांखालील संघात खेळताना चमकदार कामगिरी केली आहे. त्याच्या फिरकीची जादू पाहून गुजरात टायटन्सनं मानवला मिनी लिलावात 20 लाख रुपयांना विकत घेतलं आणि त्याला आपल्या संघाचा भाग बनवलं.
21 वर्षीय मानव डाव्या हातानं फिरकी, आर्मर आणि सीम स्विंग गोलंदाजी करू शकतो. त्यानं 2022-23 च्या मोसमात 92 बळी घेतले होते. तसेच वेगवेगळ्या वयोगटात त्याच्या नावे सुमारे 250 बळी आहेत. मानव आता गुजरात टायटन्ससाठी चांगली कामगिरी करून आपली छाप सोडण्याचा प्रयत्न करेल.
आयपीएलमध्ये पदार्पण करण्यापूर्वी मानव सुथारनं आपल्या टी20 कारकिर्दीत 7 सामने खेळले आहेत. यामध्ये त्यानं 4 विकेट घेतल्या आहेत. त्याचवेळी मानवनं प्रथम श्रेणी आणि लिस्ट ए कारकिर्दीत एकूण 80 विकेट घेतल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये मानवनं तीन अर्धशतकांच्या मदतीने 488 धावाही केल्या आहेत. तर लिस्ट ए मध्ये त्याच्या बॅटमधून 85 धावा निघाल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
पंजाब किंग्जचा कर्णधार शिखर धवन मैदानावर कधी परतणार? या हंगामात पुन्हा खेळणार की नाही?
बर्फाळ दऱ्यांमध्ये पत्नीसोबत रोमँटिक झाला ऋतुराज गायकवाड, पाहा चेन्नईच्या कर्णधाराचं हे वेगळं रुप