---Advertisement---

वेस्ट इंडिज नवीन बॅटींग कोच झालेला कोण आहे हा माॅंटी देसाई?

---Advertisement---

वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने नुकतेच भारताच्या माँटी देसाई यांची फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. त्यामुळे आता देसाई पुढील 2 वर्षे वेस्ट इंडिजचे फलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम करताना दिसणार आहेत.

देसाई यांचे नाव मागील अनेक वर्षांपासून क्रिकेट वर्तुळात आहे. त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय संघांचे प्रशिक्षकपद सांभाळले आहे. त्यांनी लेव्हल 3 चे कोचिंग कोर्स पूर्ण केला आहे. तसेच त्यांनी आयसीसी वर्ल्ड क्रिकेट लीग डिव्हीजन 2 स्पर्धेत कॅनडाचे प्रशिक्षकपद सांभाळले आहे.

तसेच त्यांनी 2018मध्ये क्रिकेट विश्वचषकाच्या पात्रता फेरी स्पर्धेत अफगाणिस्तानच्या फलंदाजी प्रशिक्षकाची भूमिका निभावली आहे. याचबरोबर ते आयसीसी टी20 विश्वचषक पात्रता फेरी स्पर्धेत संयुक्त अरब अमिराती संघाचेही फलंदाजी प्रशिक्षक होते. त्यांनी 19 वर्षांखालील नेपाळ संघाच्याही प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळली आहे.

विशेष म्हणजे ते 2008 ते 2015 दरम्यान आयपीएलमधील राजस्थान रॉयल्स संघाशी जोडलेले होते. त्यांनी राजस्थानचे सहाय्यक प्रशिक्षक म्हणून काम पाहिले आहे. राजस्थान संघावर बंदी आल्यानंतर त्यांनी आयपीएलमधील गुजरात लायन्स संघाबरोबर काम केले आहे.

एवढेच नाही तर 2018-19 या देशांतर्गत क्रिकेट मोसमात त्यांनी आंध्रप्रदेशचे प्रशिक्षक म्हणूनही काम केले आहे. याचबरोबर त्यांनी इंग्लंडमधील अनेक कौंटी क्रिकेट संघांबरोबरही प्रशिक्षक म्हणून काम केले आहे.

आता देसाई वेस्ट इंडिज संघाच्या खेळाडूंना फलंदाजीचे धडे देताना दिसणार आहेत. विशेष म्हणजे वेस्ट इंडिजचे फलंदाजी प्रशिक्षक म्हणून भारताविरुद्धच्या टी20 मालिकेपासून ते काम सुरु करतील.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---