अफगानिस्तान संघाने गेल्या काही वर्षात अप्रतिम कामगिरी करत त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपला दरारा निर्माण केला आहे. यामध्ये फिरकीपटू राशिद खानने मोलाची भूमिका बजावली आहे. राशिद खानने आपल्या फिरकीच्या जाळ्यात अनेक दिग्गज फलंदाजांना अडकवलेय. आता त्याने आपल्या बालपणी तो कुठल्या क्रिकेटपटूंना फॉलो करायचा याचा खुलासा केला आहे.
राशिद खानने आपल्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात २०१५ मध्ये केली होती. त्याने जगभरातील क्रिकेट लीग स्पर्धांमध्ये अप्रतिम कामगिरी केली आहे. तसेच त्याच्या नावे ६०० पेक्षा अधिक गडी बाद करण्याचा अनुभव असून, या दरम्यान त्याने १५ वेळेस ५ गडी बाद करण्याचा पराक्रम केला आहे. गोलंदाजीच नव्हे तर अनेकदा त्याने आपल्या फलंदाजीने देखील संघाला विजय मिळवून दिले आहेत.
कोण होते राशिद खानचे हिरो?
क्रिकेट मंथली सोबत चर्चा करताना रशिद खानने म्हटले की, “फलंदाजी बद्दल बोलायचं झालं तर मला सचिन तेंडुलकरांची फलंदाजी खूप आवडायची. मला षटकार मारण्यात रस नव्हता. मला ग्राउंड शॉट खेळायला आवडायचे. परंतु काय माहीत अचानक काय असे काय घडले आणि मला षटकार मारायला जास्त आवडायला लागले.”
गोलंदाजीमध्ये हे दोघे आहेत राशिद खानचे हिरो
राशिद खान सध्या टी -२० आणि वनडे क्रिकेटमध्ये सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे. त्याने कुठल्या गोलंदाजांना पाहून गोलंदाजीचे धडे गिरवले याबाबत बोलताना राशिद खान म्हणाला, “मी अनिल कुंबळे आणि शाहीद आफ्रिदी यांना फॉलो करायचो. जेव्हा मी घरी माझ्या भावंडांसोबत क्रिकेट खेळायचो, त्यावेळी मी अनिल कुंबळे सारखे वेगवान चेंडू टाकायचो. मला या दोन्ही गोलंदाजांना खेळताना पाहायला खूप आवडायचं. मी आताही या दोन्ही गोलंदाजांचे व्हिडिओ पाहत असतो. मी त्यांच्याकडून भरपूर काही शिकलो आहे.” राशिद खानने टी -२० कारकिर्दीत आतापर्यंत २७५ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याला ३८० गडी बाद करण्यात यश आले आहे.






