ऑस्ट्रेलियामध्ये सुरु असलेल्या महिला टी२० विश्वचषकात भारताच्या १६ वर्षीय शेफाली वर्माने तुफानी फटकेबाजी करताना सर्वांचे लक्ष वेधले आहे. तिने या विश्वचषकात १६१ च्या स्ट्राईकरेटने ४ सामन्यात १६१ धावा केल्या आहेत.
शेफालीचा या विश्वचषकात सर्वात जास्त स्ट्राईक रेट आहे. तिच्या याच कामगिरीमुळे आज ती आयसीसी महिला टी२० क्रमवारीत अव्वल क्रमांकाची फलंदाज आहे.
शेफालीने भारताकडून मागीलवर्षी २४ सप्टेंबरला दक्षिण आफ्रिका महिला संघाविरुद्धच्या टी२० सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यावेळी तिचे वय अवघे १५ वर्षे २३९ दिवस होते. त्यामुळे ती भारताकडून आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये पदार्पण करणारी सर्वात युवा क्रिकेटपटू ठरली होती.
त्यावेळी तिला भारताची अनुभवी क्रिकेटपटू मिताली राजने टी२०मधून निवृत्ती घेतल्याने भारतीय संघात स्थान मिळाले होते. तिनेही पुढे तिच्या दमदार कामगिरीच्या जोरावर संघातील स्थान पक्के केले. शेफाली ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारी भारताची दुसऱ्या क्रमांकाची सर्वात युवा क्रिकेटपटू आहे.
या यादीत अव्वल क्रमांकावर गार्गी बॅनर्जी आहेत. त्यांनी १९७८ मध्ये १४ वर्षे १६५ दिवस एवढे वय असताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.
देशांतर्गत क्रिकेट हरियाणाकडून खेळणाऱ्या शेफालीचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पदार्पण मात्र खराब झाले. ती चौथ्याच चेंडूवर शून्य धावेवर बाद झाली. पण असे असले तरी तिने पुढील काही सामन्यातच तिचा आदर्श असणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरचा मोठा विक्रम मोडला.
तिने 9 नोव्हेंबर २०१९ ला वेस्ट इंडिज महिला विरुद्ध खेळताना आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिलेच अर्धशतक केले. त्यावेळी तिचे वय १५ वर्षे २८५ दिवस इतके होते. ती भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अर्धशतक झळकावणारी सर्वात युवा क्रिकेटपटू ठरली होती. हा विक्रम करताना तिने सचिन तेंडूलकरचा ३० वर्षे जूना विक्रम मोडला. सचिनने १६ वर्षे २१४ दिवस एवढे वय असताना २४ ऑक्टोबर १९८९ ला पाकिस्तान विरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याचे पहिले अर्धशतक केले होते.
शेफाली लहानपणापासून तिच्या वडीलांबरोबर आणि भावाबरोबर सराव करायची. तिने वयाच्या अवध्या १३ व्या वर्षीच हरियाणाच्या १९ वर्षांखालील संघात स्थान मिळवले.
शेफालीला सुरुवातीला तिच्या वडीलांनी क्रिकेटचे ट्रेनिंग दिले. तसेच ती म्हणते की ‘आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळावे हे माझे आणि माझ्या वडीलांचे स्वप्न आहे.
अनेक युवा क्रिकेटपटूंप्रमाणे शेफालीसाठीही मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर आदर्श आहे. हरियाणातील रोहतकची असणाऱ्या शेफालीने सचिनला २०१३ मध्ये हरियाणातील बन्सी लाल स्टेडीयममध्ये रणजी ट्रॉफी स्पर्धेत फलंदाजी करताना पाहिले होते.
तसेच ती नुकतीच काही दिवसांपूर्वी सचिनला भेटली होती. या भेटीदरम्यानचा फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला होता.
शेफाली मागीलवर्षी झालेल्या महिला आयपीएलमध्येही मिताली राजने नेतृत्व केलेल्या वेलोसिटी संघाकडून खेळली. या स्पर्धेत तिने 3 सामन्यात 47 धावा केल्या होत्या.
तसेच यावर्षी बीसीसीआयने जाहीर केलेल्या वार्षिक मानधन कराराच्या यादीतही शेफालीला स्थान मिळाले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
–महिला टी२० विश्वचषकातील भारताचे टॉप ३ गोलंदाज






