भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून उभय संघात ५ सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. आतापर्यंत या मालिकेतील ४ सामने पार पडले असून भारतीय संघ मालिकेत २-१ ने आघाडीवर आहे. सोमवारी (०६ सप्टेंबर) द ओव्हल येथे झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात १५७ धावांनी विजय मिळवत त्यांनी ही आघाडी घेतली आहे. या मालिकेदरम्यान इतर गोष्टींबरोबर भारताचा अष्टपैलू आर अश्विन याचीही खूप चर्चा झाली आहे. कर्णधार विराट कोहली आणि संघ प्रशिक्षक रवी शास्त्री यांना त्याला संघाबाहेर बसवण्याच्या निर्णयावरुन टीकेलाही सामोरे जावे लागले आहे.
अशात ओव्हलवरील ऐतिहासिक विजयानंतर इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू ख्रिस ट्रेमलेट यांनी अश्विनबद्दल मोठे विधान केले आहे. त्यांच्या या विधानामुळे ते ट्रोलसुद्धा होत आहेत.
भारतीय संघाने अनुभवी फिरकी गोलंदाज अश्विनच्या अनुपस्थितीत ५० वर्षांनतर ओव्हलच्या मैदानावर ऐतिहासिक विजय मिळवला आहे. त्यांच्या या विजयात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याचा मोलाचा वाटा राहिला. याच पाश्वभूमीवर ट्रेमलेट यांनी ट्वीट करत लिहिले की, ‘कोणाला अश्विनची गरज आहे, जेव्हा तुमच्याकडे बुमराह असेल. काय शानदार गोलंदाज आहे तो. अप्रतिम, अद्भुत गोलंदाजी. भारतीय संघही दमदार खेळला आहे.’
हे ट्वीट करत माजी वेगवान गोलंदाज ट्रेमलेट यांनी बुमराहचे तोंडभरुन कौतुक केले आहे. मात्र दुसरीकडे अश्विनवर दुर्लक्ष केल्याने त्यांना टीकेचा सामना करावा लागत आहे.
Who needs Ashwin when you have Bumrah. What a bowler and well played India ????????. Serious bowling display ????????????????
— Chris Tremlett (@ChrisTremlett33) September 6, 2021
या सामन्यात बुमराहने पहिल्या डावात २ आणि दुसऱ्या डावात २ अशा एकूण ४ विकेट्स घेतल्या आहेत. त्यातही इंग्लंडचा यष्टीरक्षक जॉनी बेयरस्टोला त्याने टाकलेला यॉर्कर चेंडू सामन्याचे आकर्षण ठरला. अगदी इंग्लंडचा कर्णधार जो रूट यानेही त्याच्या या यॉर्करला सामन्यातील टर्निंग पाँईट म्हणून संबोधले आहे. याच सामन्यादरम्यान बुमराहने कसोटी क्रिकेटमधील आपल्या १०० विकेट्सही पूर्ण केल्या आहेत.
दुसरीकडे ४१३ कसोटी विकेट्स घेणारा अश्विन अद्याप या मालिकेतील एकही सामना खेळू शकलेला नाही. कर्णधार कोहलीने त्याच्या जागी फिरकी गोलंदाजी अष्टपैलू रविंद्र जडेजाला पहिल्या ४ सामन्यात खेळवले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘विराटसेने’च्या ऐतिहासिक विजयानंतर एबीचे भन्नाट ट्वीट, टीकाकारांची बसली असेल ‘दातखिळी’!
एक नंबर विकेट! मयंकचा ‘रॉकेट थ्रो’ अन् रिषभची चपळता, इंग्लंडचा मोठा फलंदाज दुर्देवीरित्या धावबाद
प्रबळ आत्मविश्वास… ‘त्याने’ स्वत:हून गोलंदाजी मागितली अन् मोठ्या विकेट्सही घेतल्या, कोहलीचा उलगडा






