दक्षिण आफ्रिका संघाचा माजी कर्णधार एबी डिविलियर्सने यापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यानंतर शुक्रवारी (१९ नोव्हेंबर) त्याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. डिविलियर्सच्या निवृत्तीनंतर त्याची आयपीएल फ्रेंचायझी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या कर्णधारपदाविषयी पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. कर्णधार विराट कोहलीने आयपीएल २०२१ दरम्यान तो पुढच्या वर्षी आरसीबीचे नेतृत्व करणार नसल्याचे सांगितले होते. विराटने संघाचे नेतृत्व सोडल्यानंतर डिविलियर्स कर्णधापदासाठी सर्वात महत्वाचा दावेदार होता.
विराट कोहलीने कर्णधारपद सोडल्यानंतर आता डिविलियर्सने देखील निवृत्ती घेतली आहे. आता आरसीबीच्या कर्णधारपदासाठी पेच निर्माण झाला आहे. आपण या लेखात अशा चार खेळाडूंचा उल्लेख करणार आहोत, जे आयपीएलच्या पुढच्या हंगामात आरसीबीचे नेतृत्व करू शकतात.
१. ग्लेन मॅक्सवेल – पुढच्या वर्षी आरसीबीचे नेतृत्व करण्यासाठी सर्वात आघाडीवर ग्लेन मॅक्सवेलचे नाव आहे. मॅक्सवेल यावर्षीच्या हंगामात आरसीबीमध्ये सामील झाला होता. त्याने या हंगामात संघासाठी चांगल्या फलंदाजीचे प्रदर्शन केले. विराट कोहली आणि एबी डिविलियर्सनंतर मॅक्सवेल आरसीबीचा सर्वात महत्वाचा फलंदाज होता. आता डिविलियर्सने निवृत्ती घेतल्यानंतर आरसीबी संघ त्याला पुढच्या हंगामासाठी संघात कायम ठेऊ शकते तसेच नेतृत्वाची जबाबदारी देखील त्याच्यावर सोपवली जाऊ शकते.
२. केएल राहुल – केएल राहुल आयपीएल २०२१ मध्ये पंजाब किंग्स संघाचा कर्णधार होता. त्याच्याविषयी अनेक बातम्या समोर आल्या होत्या की, तो पुढच्या हंगामात पंजाब किंग्ज संघाची साथ सोडणार आहे. असे झाले तर आरसीबी संघ पुढच्या हंगामापूर्वी होणाऱ्या मेगा लिलावात मोठी रक्कम देऊन त्याला संघात सामील करू शकतो. जर राहुल पुढच्या हंगामात आरसीबी संघात सामील झाला, तर त्याच्यावर संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी दिली जाऊ शकते.
३. डेविड वार्नर – डेविड वॉर्नरने त्याची आयपीएल फ्रेंचायझी सनरायझर्स हैदराबादला २०१६ मध्ये आयपीएलचे जेतेपद जिंकवून दिले होते. मात्र, आयपीएल २०२१ च्या हंगामात त्याला फ्रेंचायझीकडून खूपच चुकीची वागणूक मिळली. सुरुवातील वॉर्नरकडून संघाचे कर्णधारपद काडून घेण्यात आले. त्यानंतर त्याला संघाच्या प्लेइंग इलेव्हनमधूनही बाहेर केले गेले. याच पार्श्वभूमीवर वॉर्नरने स्पष्ट केले आहे की, तो लिलावात सामील होणार आहे. वॉर्नरने यापूर्वी एक यशस्वी कर्णधार आणि उत्तम फलंदाजाच्या रूपात स्वतःला सिद्ध केले आहे. अशात आरसीबी संघ पुढच्या हंगामात त्याला संघात सामील करू इच्छित असेल आणि त्यानंतर त्याला संघाचे कर्णधारपद देखील दिले जाऊ शकते.
४.एरॉन फिंच – ऑस्ट्रेलिया संघाला नुकत्याच पार पडलेल्या टी२० विश्वचषकाचे जेतेपद जिंकवून देणारा त्यांचा कर्णधार एरॉन फिंच आरसीबीचा पुढचा कर्णधार होऊ शकतो. फिंच यापूर्वी २०२० मध्ये आरसीबीसाठी खेळला आहे. मात्र, २०२१ च्या हंगामात त्याला कोणत्याच संघाने विकत घेतले नाही. आता पुढच्या आयपीएल हंगामात आरसीबीला नवीन कर्णधाराची गरज आहे. अशात आरसीबी संघ फिंचला पुन्हा संघात सामील करू शकतो आणि त्याच्यावर नेतृत्वाची जबाबदारी येऊ शकते.