मुंबई। आज(10 एप्रिल) आयपीएल 2019 मध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब संघात सामना होणार आहे. पण या सामन्याआधी मुंबई इंडियन्स संघाला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा नियमित कर्णधार रोहित शर्माला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली आहे.
त्याला मंगळवारी मुंबई इंडियन्सच्या सराव सत्रादरम्यान स्नायूमध्ये ताण जाणवला, त्यामुळे त्याच्यावर लगेचच मुंबई इंडियन्सचे फिजिओ नितीन पटेल यांनी उपचार केले. परंतू उपचारानंतरही रोहित लगेच ड्रेसिंग रुममध्ये परतला आणि त्यानंतर पुन्हा तो मैदानात आला नाही.
मात्र अजून रोहितची दुखापत किती गंभीर आहे याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. परंतू पुढील महिन्यात विश्वचषक असल्याने आणि 15 एप्रिलला या विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा होणार असल्याने मुंबई इंडियन्स रोहितच्या बाबतीत कोणताही मोठा धोका पत्करणार नाही. त्यामुळे रोहितला या दुखापतीमुळे पंजाब विरुद्धचा सामना मुकावा लागू शकतो.
असे जर झाले तर रोहित ऐवजी मुंबई इंडियन्सचे प्रभारी कर्णधारपद कोणाला द्यायचे हा प्रश्न मुंबई इंडियन्ससमोर उभा असेल.
रोहितच्या अनुपस्थित हे खेळाडू करु शकतात मुंबई इंडियन्सचे नेतृत्व-
लसिथ मलिंगा – मलिंगा हा मुंबई इंडियन्सच्या संघातील एक महत्त्वाचा खेळाडू आहे. तसेच तो मर्यादित षटकांच्या क्रिकेटसाठी श्रीलंका संघाचा कर्णधार आहे. त्यामुळे त्याच्याकडे एक खेळाडू आणि कर्णधार म्हणून चांगला अनुभव आहे. तसेच मलिंगा हा मुंबईच्या संघातील नियमीत सदस्य असल्याने तो मुंबई इंडियन्सचे प्रभारी कर्णधारपद सांभाळण्यासाठी प्रबळ दावेदार आहे.
किरॉन पोलार्ड – मलिंगा प्रमाणेच पोलार्ड हाही मुंबईच्या संघातील नियमित सदस्य आहे. त्याच्याबद्दल बोलताना काही दिवसांपूर्वी मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षक माहेला जयवर्धने म्हणाले होते की तो नेतृत्व करणाऱ्या गटातील आहे. त्यामुळे तो देखील मुंबई इंडियन्ससमोर कर्णधार म्हणून पर्याय असेल.
युवराज सिंग – यावर्षी आयपीएमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या युवराजवर मुंबई इंडियन्स प्रभारी कर्णधार म्हणून विश्वास दाखवू शकतात. त्याने यावर्षी मुंबईकडून चांगली कामगिरीही केली आहे. तसेच त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा मोठा अनुभवही आहे.
त्याचबरोबर त्याने आयपीएलमध्ये याआधी किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने नेतृत्वही केले आहे. त्यामुळे तोही प्रभारी कर्णधारपदासाठी प्रबळ दावेदार आहे.
क्विंटन डी कॉक – मुंबई इंडियन्सचा यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डीकॉक हा देखील मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करण्यासाठी एक चांगला पर्याय आहे. त्याने याआधी दक्षिण आफ्रिका संघाचेही काही सामन्यात नेतृत्व केले होते. तसेच त्याच्याकडे चांगला अनुभवही आहे आणि यष्टीरक्षक असल्याने तो मैदानावर खेळाडूंच्या संपर्कातही राहू शकतो.
हार्दिक पंड्या – रोहित ऐवजी भारतीय खेळाडूकडे प्रभारी नेतृत्व द्यायचे असे झाल्यास हार्दिक पंड्याचाही मुंबई इंडियन्स प्रभारी कर्णधार म्हणून विचार करु शकतात. त्याने मुंबई इंडियन्सकडून शानदार कामगिरी केली आहे. तसेच तो संघात मागील अनेक मोसमांपासून नियमित खेळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
–‘यूनिवर्स बॉस’ ख्रिस गेलने चाहत्यांबरोबर असा साजरा केला विजयाचा आनंद, पहा व्हिडिओ
–असे होणार आहेत टीम इंडियाचे २०१९ विश्वचषकाआधी सराव सामने
–या गोष्टीचा विश्वचषकासाठी भारतीय संघ निवडताना विचार केला जाणार नाही!