मुंबई । या महिन्यात होणाऱ्या तिसऱ्या फेडरेशन कप स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष आणि महिला संघाची घोषणा ६ फेब्रुवारी रोजी होणार आहे.
हैद्राबाद येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेतील महाराष्ट्राच्या महिलांच्या संघात ४ बदल होणार आहे. परंतु कर्णधार म्हणून सायली जाधवच जबाबदारी पार पडणार असल्याचे स्पष्ट संकेत महाराष्ट्र कबड्डी असोशिएशनचे सचिन अस्वाद पाटील यांनी दिले आहेत.
अभिलाषा म्हात्रेने गोरगन, इराण येथे झालेल्या स्पर्धेत भारताला सुवर्णपदक जिंकून दिले होते तर सायली जाधव ही ६५व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला संघाची कर्णधार होती. या स्पर्धेत महाराष्टाच्या संघाला उपांत्यपूर्व फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले होते.
याबद्दल आज महा स्पोर्ट्सशी बोलताना अस्वाद पाटील यांनी पुरुष आणि महिला संघाचे कर्णधारपद याही स्पर्धेत कायम ठेवण्याचे संकेत दिले आहेत. “कर्णधारपद हे जवळपास त्याच खेळाडूंकडे कायम राहील. परंतु याचा अंतिम निर्णय आम्ही ६ तारखेलाच घेऊ. ” असे ते म्हणाले.
भारताची कर्णधार अभिलाषा म्हात्रे आणि महाराष्ट्राची कर्णधार सायली जाधव या दोघीही मुंबई उपनगरच्या खेळाडू असल्याने आणि स्पर्धेचे आयोजकही मुंबई उपनगर असल्याने घरच्या मैदानावर खेळताना या खेळाडूंकडून मोठी अपेक्षा चाहते ठेवणार हे मात्र नक्की.
तिसरा फेडरेशन कप मुंबई उपनगर कबड्डी असोशिएशन आयोजित करत असून ९ फेब्रुवारी ते १२ फेब्रुवारी २०१८ या काळात ही एसआरपीएफ क्रीडांगण, जयकोच, पश्चिम द्रुतगती महामार्ग जोगेश्वरी येथे ही स्पर्धा होणार आहे.
उपलब्ध माहितीप्रमाणे या स्पर्धेचे प्रथम १९८२ मध्ये प्रथम आयोजन झाले होते तर २०१७मध्ये इंदोर शहरात ही स्पर्धा झाली होती. या स्पर्धेत राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत खेळलेले महिला आणि पुरुष गटाचे संघ भाग घेणार आहे.
दोन्ही गटाचे मिळून एकूण १६ संघ या स्पर्धेत खेळताना दिसतील. त्यामुळे एकप्रकारे कबड्डीमधील भारतातील दिग्गज संघ या स्पर्धेत भाग घेताना दिसतील.