भारताच्या टी२० आणि एकदिवसीय पाठोपाठ आता कसोटी संघाला देखीन नवीन कर्णधार लाभणार आहे. दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत पराभव झाल्यानंतर विराट कोहली (virat kohli) याने कसोटी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. त्याच्या या निर्णयानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. कोहलीच्या कसोटी कर्णधारपद सोडण्याच्या ट्वीटनंतर सर्वांच्या मनात एक प्रश्न नक्कीच निर्माण झाला, तो म्हणजे विराटनंतर भारताचा कसोटी कर्णधार कोण ? आपण या लेखात अशा चार खेळाडूंची माहिती घेणार आहोत, जे विराट कोहलीनंतर कसोटी संघाचे कर्णधारपद स्वीकारण्यासाठी प्रबळ दावेदार आहेत.
विराट कोहलीनंतर कसोटी संघाच्या कर्णधारपदासाठी प्रबळ दावेदार –
केएल राहुल (kl rahul):
विराट कोहलीनंतर कसोटी कर्णधारपद सांभाळण्यासाठी ज्या नावांची सर्वाधिक चर्चा होत आहे, त्यापैकी केएल राहुल हे एक आहे. केएल राहुलने दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात संघाचे नेतृत्व केले होते. विराट या सामन्यात दुखापतीमुळे सहभागी होऊ शकला नव्हता, परंतु, राहुलच्या नेतृत्वातील भारतीय संघ या सामन्यात पराभूत झाला होता. राहुल सध्या त्याच्या कारकिर्दीतील सर्वात चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याचे वय २९ वर्ष आहे आणि जर त्याच्याकडे कसोटी संघाचे नेतृत्व दिले गेले, तर पुढच्या मोठ्या काळापर्यंत बीसीसीआयला नवीन कर्णधार शोधण्याची गरज पडणार नाही.
रोहित शर्मा:
कसोटी संघाचे कर्णधारपद सोपवण्यासाठी बीसीसीआयकडे दुसरा सर्वात उत्तम पर्याय आहे रोहित शर्मा. मागच्या काही दिवसांपासून रोहित भारताच्या टी२० आणि एकदिवसीय संघाचे नेतृत्व करत आहे. अशात कसोटी संघाचे कर्णधारपद देखील त्याच्याकडे देता येऊ शकते. भारताला या संपूर्ण वर्षात फक्त तीन कसोटी सामने खेळायचे आहेत, अशात सध्यासाठी रोहित शर्माला कसोटी कर्णधार बनवले जाऊ शकते. भविष्यात कर्णधारपदासाठी इतरही पर्यात समोर येतील.
जसप्रीत बुमराह:
विराटनंतर कसोटी कर्णधारपदाच्या शर्यतीत जसप्रीत बुमराहचे देखील नाव असणार आहे. दक्षिण अफ्रिकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या आगामी एकदिवसीय मालिकेसाठी बुमराहला भारताचा उपकर्णधार बनवले गेले आहे. याच पार्श्वभूमीवर त्याचे नाव कसोटी कर्णधारपदासाठी देखील चर्चेत येत आहे. ऑस्ट्रेलियाने देखील नुकतेच्या वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सकडे कसोटी संघाचे कर्णधारपद सोपवले आणि त्यांचा हा निर्णय योग्य ठरला. पॅट कमिन्सच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने ऍशेस मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. बुमराहकडे जर संघाचे कर्णधारपद आले, तर तो अनिल कुंबळेंनंतर भारताचे नेतृत्व करणारा दुसरा गोलंदाज असेल.
अजिंक्य रहाणे:
अजिंक्य रहाणे मोठ्या काळासाठी भारतीय संघाचा कसोटी उपकर्णधार होता. मागच्या महिन्यात त्याच्याकडून ही जबबादारी काढून घेण्यात आली. मागच्या बऱ्याच महिन्यांपासून त्याचे प्रदर्शन निराशाजनक असल्यामुळे त्याला संघाचे उपकर्णधारपद सोडावे लागले होते. असे असले तरी, त्याच्या नेतृत्वात भारतीय संघाने अनेक कसोटी सामने जिंकले आहेत, ही गोष्टी विसरून चालणार नाही. यामध्ये त्याच्या नेतृत्वात भारताने ऑस्ट्रेलियात मिळवलेला कसोटी मालिका विजय नेहमी लक्षात राहील. अजिंक्य रहाणे संघाचे कर्णधारपद सांभाळण्यासाठी सक्षम आहे, परंतु दुसऱ्या बाजूला ही जबाबदारी दिल्यामुळे बोर्डवर टीका देखील होऊ शकते. खराब फॉर्मशी झगडणाऱ्या रहाणेला कर्णधारपद दिल्यावर चाहते प्रश्न उपस्थित करू शकतात.
महत्वाच्या बातम्या –
विराटच्या कसोटी कर्णधारपद सोडण्यावर बीसीसीआयची आली पहिली प्रतिक्रिया; पाहा काय म्हटलंय
विराटचा कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा! पद सोडताना लिहिली भली मोठी पोस्ट, वाचा काय म्हटलंय…
ब्रॉड बनला ‘अव्वल नंबरी’! ऍशेस इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले स्वतःचे नाव
व्हिडिओ पाहा –