वैभव सूर्यवंशी या नावाची मागच्या सहा महिन्यांपासून चर्चा सुरू आहे. हा तो खेळाडू आहे ज्याने 14 वर्षांच्या वयामध्ये आयपीएल स्पर्धेत पदार्पण करून रेकॉर्ड बनवलं आहे. मेगा लिलावात हा सर्वात युवा खेळाडू करोडपती बनला. पदार्पण सामन्यात षटकार झळकावत सुरुवात करून क्रिकेट विश्वात त्याने खळबळ निर्माण केली. सगळीकडे वैभवचे व्हिडिओ आणि कौतुकांचा वर्षा होत होता. पण दुसऱ्या सामन्यात त्याची बॅट शांत राहिली त्यानंतर दिग्गज वीरेंद्र सेहवागने त्याला मोठा सल्ला दिला आहे.
सेहवाग यांनी वैभवला विराट कोहलीचे उदाहरण दिले. वैभवने पदार्पण सामन्यात 34 धावांची दमदार खेळी केली होती. पदार्पणातील पहिल्या चेंडूत त्याने षटकार मारत इतिहास रचला. दुसऱ्या सामन्यात मात्र घाईच्या नादात वैभवने फक्त 16 धावा केल्या नंतर तो बाद झाला.
सेहवाग यांनी क्रिकबजशी बोलताना म्हटले, वैभव सूर्यवंशीने आयपीएलमध्ये वीस वर्षापर्यंत खेळण्याचं टार्गेट सेट केलं पाहिजे. विराट कोहलीला बघा, त्याने 19 वर्षांच्या वयामध्ये खेळण्यास सुरुवात केली. त्याने आतापर्यंत अठरा हंगाम खेळले आहेत. वैभवने सुद्धा हेच करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर तो आयपीएल मधून आनंदी असेल, जर तो हा विचार करत असेल तो आता करोडपती आहे. त्याचे पदार्पण शानदार पद्धतीने झाले आहे, त्याने षटकार मारला. तर कदाचित आपण त्याला पुढच्या हंगामात खेळताना नाही बघू शकणार.
24 एप्रिल रोजी आरसीबीने राजस्थान संघासमोर 206 धावांचं आव्हान ठेवलं होतं. वैभव आणि जयस्वालकडून चांगल्या खेळीची अपेक्षा होती, पण वैभवने केवळ 16 धावा केल्या आणि त्याची विकेट गमावली. जयस्वाल त्याच्या अर्धशतकापासून 11 धावा दूर राहिला. शेवटी 11 धावांनी आरसीबीने विजय मिळवला.






