बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024 साठी भारतीय संघात अनुभवी आणि तरुण खेळाडूंचा अनोखा मिलाफ आहे. सध्या विराट कोहली भलेही फॉर्ममध्ये नसेल, पण त्याची केवळ उपस्थितीही विरोधी संघावर दबाव आणण्यासाठी पुरेशी आहे. भारतीय संघाकडे रिषभ पंतसारखा अव्वल यष्टीरक्षक आणि जागतिक दर्जाचा फलंदाज आहे, ज्यानं यापूर्वी आपल्या कामगिरीनं बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी गाजवली आहे. जसप्रीत बुमराह देखील काही कमी नाही. त्याला ऑस्ट्रेलियन मीडियाकडून खूप आदर मिळतो. मात्र या सगळ्यात भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या कुठेच दिसत नाही. तो बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये न खेळण्याचं कारण काय?
हार्दिक पांड्या हा जागतिक दर्जाचा अष्टपैलू खेळाडू आहे यात शंका नाही. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील त्याची आकडेवारी खूपच प्रभावी आहे. मात्र ऑगस्ट 2018 नंतर त्यानं भारतासाठी एकही कसोटी सामना खेललेला नाही. पांड्याची फिटनेस हे त्याचं कसोटी न खेळण्याचं प्रमुख कारण आहे. हार्दिकला 2018-19 मध्ये पाठदुखीचा त्रास होऊ लागला, ज्यानंतर त्यानं गोलंदाजी करणंही बंद केलं होतं.
कसोटी क्रिकेटमध्ये गोलंदाजांना लांब स्पेल टाकावे लागतात. पण दुखापतींचा इतिहास हार्दिकच्या शरीराला दीर्घ काळ गोलंदाजी करू देत नाही. वारंवार दुखापतींमुळे पांड्या एकदिवसीय सामन्यांमध्ये क्वचितच 10 षटके टाकताना दिसतो. 2018 नंतर हार्दिकचं कसोटी संघात पुनरागमन न होण्याचं सर्वात मोठं कारण त्याचा फिटनेस आहे.
31 वर्षीय हार्दिक पांड्यानं त्याच्या कारकिर्दीत एकूण 11 कसोटी सामने खेळले, ज्यामध्ये त्यानं एक शतक आणि चार अर्धशतकं झळकावत एकूण 532 धावा केल्या. त्यानं गोलंदाजीत 17 विकेट्सही घेतल्या आहेत. हार्दिकनं मर्यादित षटकांच्या दोन्ही फॉरमॅटमध्ये एकूण 3,469 धावा आणि 173 विकेट्स घेतल्या आहेत. हार्दिकनं काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, जर त्यानं कसोटी क्रिकेट खेळणं सुरू ठेवलं असतं तर तो कदाचित मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये इतक्या मोठ्या पदापर्यंत पोहोचू शकला नसता.
हेही वाचा –
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना मोबाईलवर लाइव्ह कुठे पाहायचा? भारतीय वेळेनुसार टॉस किती वाजता होईल?
वीरेंद्र सेहवागच्या मुलाची झंझावाती खेळी! चौकार-षटकारांची आतषबाजी करत ठोकलं द्विशतक
1947 पासून भारतानं ऑस्ट्रेलियात फक्त इतके कसोटी सामने जिंकले, प्रत्येक मालिकेचा निकाल जाणून घ्या