भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध 3 सामन्यांची वनडे मालिका खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. या मालिकेतील पहिला सामना (11 जानेवारी) रोजी खेळवला जाणार आहे. भारतीय संघातील अनेक खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ आधीच बडोद्यात पोहोचला आहे. मात्र, भारतीय संघाचे 4 स्टार खेळाडू अद्याप बडोद्यात पोहोचलेले नाहीत, ज्यामध्ये श्रेयस अय्यरच्या नावाचाही समावेश आहे. हे 4 खेळाडू अजून का पोहोचले नाहीत? यामागचे कारण जाणून घेऊया.
श्रेयस अय्यर, रिषभ पंत, मोहम्मद सिराज आणि रवींद्र जडेजा अद्याप बडोद्यात पोहोचलेले नाहीत. याचे कारण असे की, हे खेळाडू सध्या विजय हजारे ट्रॉफी खेळत असून आपापल्या राज्यांचे प्रतिनिधित्व करत आहेत. याच कारणामुळे त्यांनी अद्याप भारतीय संघात सामील होण्यास उशीर केला आहे. मात्र, (9 जानेवारी) रोजी हे खेळाडू भारतीय संघात सामील होण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्याकडून चाहत्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. या दोन्ही खेळाडूंनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शानदार कामगिरी केली होती. त्यामुळे आता न्यूझीलंडविरुद्धही हे दोन्ही फलंदाज मैदानात ‘आग ओकायला’ सज्ज आहेत.
विजय हजारे ट्रॉफी 2025-26 मध्ये रिषभ पंत दिल्लीचे नेतृत्व करत आहे, तर श्रेयस अय्यरने मुंबईचे कर्णधारपद भूषवले आहे. याव्यतिरिक्त मोहम्मद सिराजने हैदराबादचे प्रतिनिधित्व केले, तर रवींद्र जडेजा सौराष्ट्र संघाचा भाग होता. दरम्यान, विजय हजारे ट्रॉफीच्या क्वार्टर फायनलमध्ये एकूण 8 संघांनी जागा मिळवली आहे. यामध्ये पंजाब, मुंबई, दिल्ली, उत्तर प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, सौराष्ट्र आणि विदर्भ या संघांचा समावेश आहे.






