बहुप्रतिक्षित आशिया चषक २०२२ चा प्रारंभ २७ ऑगस्टपासून होणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान संघात होणार आहे. तर आशिया चषकातील सर्वात यशस्वी भारत संघ २८ ऑगस्टपासून कट्टर प्रतिद्वंद्वी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने मोहिमेची सुरुवात करेल. यंदाचा आशिया चषक टी२० स्वरूपात खेळला जाणार आहे. यापूर्वी २०१८ मध्ये झालेला आशिया चषक ५० षटकांच्या स्वरूपात खेळला गेला होता. मग चाहत्यांना प्रश्न पडला असेल की, ही स्पर्धा वेगवेगळ्या स्वरूपात का खेळवली जात आहे?. याच प्रश्नाचे उत्तर या बातमीतून जाणून घेऊ.
एप्रिल २०१५ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेद्वारे (आयसीसी) आशियाई क्रिकेट परिषदेच्या आकारमानात घट झाल्यानंतर, आगामी आशिया चषक वनडे (Asia Cup 2022) आणि टी२० स्वरूपात रोटेशन पद्धतीने खेळवला जाईल, अशी घोषणा करण्यात आली. हे रोटेशन आयसीसीच्या स्पर्धेवर अवलंबून असेल.
वर्ष २०१६ मध्ये पहिल्यांदा आशिया चषक टी२० स्वरूपात (T20 Format) खेळला गेला होता. कारण २०१६ च्या टी२० विश्वचषकाच्या काही दिवसांपूर्वीच या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर २०१८ मध्ये आशिया चषक वनडे स्वरूपात झाला होता. पुढील वर्षी होणाऱ्या २०१९ सालच्या वनडे विश्वचषकाला लक्षात घेता हा निर्णय घेतला गेला होता. आता ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये टी२० विश्वचषक २०२२ खेळवला जाणार आहे. त्यामुळे त्याआधी होणाऱ्या आशिया चषकातील सामनेही टी२० स्वरूपात खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हा आशिया चषकाचा पंधरावा हंगाम असेल. यावर्षी आशिया चषकात एकूण ६ संघ सहभागी होणार आहेत. भारताबरोबर अ गटात पाकिस्तान आणि हाँगकाँग संघ आहेत. तर ब गटात श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेश संघ आहेत. या ६ संघात सुरुवातीला साखळी फेरी सामने होतील. त्यानंतर दोन्ही गटातील अव्वल २ संघ सुपर-४ मध्ये प्रवेश करतील. सुपर-४ मधील संघांत राउंड रॉबिनच्या आधारावर सामने होतील. अर्थात एक संघ सुपर-४ मधील सर्व संघांसोबत भिडेल. सुपर-४ मध्ये अव्वलस्थानी राहणारे २ संघ अंतिम सामन्यात प्रवेश करतील. अशाप्रकारे ही स्पर्धा खेळली जाईल.