भारतीय संघाचा दिग्गज सलामीवीर फलंदाज केएल राहुल याच्या अडचणी वाढल्याचे दिसत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात राहुलला प्लेइंग इलेव्हनच्या बाहेर ठेवले गेले. त्याच्या जागी युवा शुबमन गिल याला संघात सामील करण्यात आले आहे. राहुलची एकंदरीत कसोटी आकडेवारी आणि मागच्या काही कसोटी सामन्यांमधील त्याचे प्रदर्शन, हे पाहता संघ व्यवस्थापनाला हा निर्णय घ्यावा लागल्याचे दिसते.
मागच्या काही वर्षांमध्ये केएल राहुल (KL Rahul) याने भारतासाठी वनडे आणि टी-20 फॉरमॅटमध्ये धमाकेदार खेळी करून दाखवली आहे. पण कसोटी क्रिकेटमध्ये त्याला अपेक्षित कामगिरी करता आली नाही, असेच दिसते. राहुलने भारतीय संघासाठी आतापर्यंत 47 कसोटी सामने खेळले असून यात त्याची सरासरी 33.44 राहिली आहे. राहुल संघासाठी डावाची सुरुवात करण्यासाठी येत असल्यामुळे प्रत्येक सामन्यात त्याची खेळी महत्वाची असते. पण कसोटी क्रिकेटमध्ये त्याची सरासरी पाहता, प्रदर्शन समाधानकारक नसल्याचेच दिसते. त्याने या 47 कसोटी सामन्यांमध्ये 7 शतक आणि 13 अर्धशतकांच्या मदतीने 2642 धावा केल्या आहेत.
राहुलच्या तुलनेत भारताचे इतर फलंदाज जसे विराट कोहली, रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा यांची कसोटी सरासरी पाहिली, तर खूपच चांगली आहे. रोहितने कसोटीत 46.76, विराट 48.49, तर पुजाराने 44.41च्या सरासरीने धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्या राहुलने अवघ्या 12.66च्या सरासरीने 38 धावा केल्या. तसेच राहुलचे शेवटचे कसोटी शतक देखील 26 डिसेंबर 2021 रोजी दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध खेळताना आले होते.
दुसरीकडे शुबमन गिल (Shubman Gill) मात्र मागच्या काही महिन्यांमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. फॉर्ममध्ये असलेल्या गिलला बेंचवर बसवून राहुलला खेळण्याची संधी मिळत असल्यामुळे संघ व्यवस्थापन, कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यावर वारंवार टीका होत होती. अखेर बुधवारी संघ व्यवस्थापनाने राहुलला प्लेइंग इलेव्हनमधून वगळले आणि शुबमन गिल याला संधी दिली. गिलने 2023 सुरू झाल्यापासून तीन वनडे शतके ठोकली असून, एक वनडे द्विशतक ठोकले आहे.
तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारताची प्लेइंग इलेव्हन –
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (यष्टीरक्षक), रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, उमेश यादव, मोहम्मद सिराज.
(Why KL Rahul could not get a chance in the playing eleven in the third test match)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पीएमआर ओपन एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धेत भारताच्या सुमित नागलची विजयी सलामी
“बाबर अजून विराटच्या बरोबरीचा नाही”, पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने सांगितली कमजोरी