चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. आश्चर्याचं म्हणजे, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियात वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला स्थान मिळालेलं नाही. यावर आता स्वत: रोहितनं स्पष्टीकरण दिलं आहे. रोहित म्हणाला की, जर मोहम्मद सिराजकडे जुना चेंडू असेल, तर तो तेवढा प्रभावी ठरत नाही. मात्र सिराजला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संघात स्थान मिळवता आलं नाही हे दुर्दैवी असल्याचं रोहितनं सांगितलं.
मोहम्मद सिराजबद्दल बोलताना रोहित शर्मा म्हणाला, “आमच्याकडे कोणताही पर्याय नव्हता. आम्ही या विशिष्ट भूमिकेसाठी योग्य पर्याय शोधत होतो. आमच्याकडे असे गोलंदाज आहेत जे नवीन चेंडूनं गोलंदाजी करण्याव्यतिरिक्त मधल्या षटकांमध्ये आणि डेथ ओव्हर्समध्येही गोलंदाजी करण्यास सक्षम आहेत.” रोहित शर्माच्या मते, मोहम्मद सिराज नवीन चेंडूनं गोलंदाजी करण्यासाठी ठीक आहे परंतु जुन्या चेंडूनं त्याला संघर्ष करावा लागतो. त्यामुळे त्याला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संघातून वगळावं लागलं. सिराज यापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये दिसला होता.
जर आपण मोहम्मद सिराजच्या एकदिवसीय कारकिर्दीवर नजर टाकली, तर या वेगवान गोलंदाजानं 44 एकदिवसीय सामन्यांमध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. यात त्यानं 27.82 च्या स्ट्राईक रेटनं आणि 24.06 च्या सरासरीनं 71 विकेट्स घेतल्या. 21 धावांत 6 बळी ही सिराजची एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम गोलंदाजी आहे. या फॉरमॅटमध्ये त्यानं 5.19 च्या इकॉनॉमी रेटनं धावा दिल्या आहेत. याशिवाय, मोहम्मद सिराजनं भारतासाठी कसोटी आणि टी20 मध्ये अनुक्रमे 100 आणि 14 विकेट्स घेतल्या आहेत. तो 2024 टी20 विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा सदस्य होता.
हेही वाचा –
752 ची सरासरी, तरीही दुर्लक्ष! करुण नायरच्या हाती पुन्हा एकदा निराशा
हॅरी ब्रूक, जयस्वालसह हे चार फलंदाज ‘फॅब-4’ ची पुढील पिढी, माजी दिग्गजाची मोठी प्रतिक्रिया
मोठी बातमी! इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा