एक काळ होता जेव्हा शॉन टेट, शोएब अख्तर आणि ब्रेट लीसारखे वेगवान गोलंदाज आपल्या गोलंदाजीतील वेगाच्या बळावर जागतिक क्रिकेटवर राज्य करत होते. त्याकाळात फलंदाज या गोलंदाजांविरुद्ध फलंदाजी करण्यास घाबरत होते. परंतु या गोलंदाजांच्या निवृत्तीनंतर जागतिक क्रिकेटमध्ये वेगवान गोलंदाजांचा दुष्काळ पडला आहे. आजचे वेगवान गोलंदाज 140-145 किमी प्रतितास तर कधी जास्तीत जास्त 150 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करतात.
त्यावेळी टेट, अख्तर आणि ब्रेट ली सारखे गोलंदाज 150 किमी प्रतितास तर त्यापेक्षा जास्त वेगाने सातत्याने गोलंदाजी करत असत. मग आजचे वेगवान गोलंदाज 150 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी का करू शकत नाहीत? याबाबत आता स्वतः ऑस्ट्रेलियाचे माजी वेगवान गोलंदाज शॉन टेट यांनी कारण सांगितले आहे.
ऑस्ट्रेलियासाठी 59 आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या शॉन टेटने आपल्या कारकिर्दीत साधारण 150/160 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी केलेली आहे. टेटने अगदी सोप्या शब्दात मांडले आहे की, आजचे गोलंदाज जास्त वेगाने गोलंदाजी करू शकत नाहीत आजच्या गोलंदाजांमध्ये नेमकी कुठे आणि काय उणीव आहे?
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत टेट म्हणाला, “मी याबद्दल एका तासाहून जास्त वेळ बोलू शकतो. तुम्ही जिथे जाल तिथे गोलंदाजीचे वेळापत्रक सारखेच आहे. पूर्वी मी, शोएब आणि ब्रेट ली खेळायचो. आमचे वेळापत्रक देखील सारखेच होते. पण आम्ही त्यामध्ये आमचे स्वतःची अधिकची मेहनत देखील करायचो. आम्हाला कधीही या रोबोट प्रकाराच्या गोष्टींचा सामना करावा लागला नाही. आम्ही दिवसातून एकच गोष्ट केली नाही. प्रत्येक वेळी हे करा, ते करा, असे आम्हाला कुणीही सांगितले नाही.”
टेट पुढे म्हणाला, “आताच्या गोलंदाजांना आज विश्रांतीचा दिवस आहे, या दिवशी गोलंदाजी करा असे सांगितले जाते. आमच्यासाठी तसे नव्हते. मी दोन दिवस कठोर मेहनत घेऊन गोलंदाजी करायचो आणि पुढील दोन दिवस आराम करायचो. मला जेव्हा वाटायचे की मला विश्रांतीची गरज आहे, तेव्हा मी आराम करत असायचो.”
महत्त्वाच्या बातम्या-
आरारारा खतरनाक! चेन्नई सुपर किंग्जची सुपर डुपर बस दुबईत सज्ज, आता प्रतिक्षा फक्त…
रक्षाबंधन विशेष: पाच भारतीय दिग्गज क्रिकेटपटू आणि त्यांचे फारसे माहित नसलेले भाऊ-बहिण
रक्षाबंधन विशेष: तुमच्या आवडत्या क्रिकेटपटूंचे त्यांच्या बहिणींबरोबरच पाहा गोड फोटो