मुंबई । आयसीसी वनडे विश्वचषकात भारतीय संघाने प्रत्येक वेळी पाकिस्तानच्या संघाला हरवले आहे. पाकिस्तानचा संघ मोठी धावसंख्या उभारली तरी भारतीय संघ तो सहज पार करत विजय मिळवतो. 1992 साली झालेल्या विश्वचषकात पाकिस्तानचा संघ विश्वविजेता बनला होता. मात्र, याच स्पर्धेत साखळी सामन्यात भारताकडून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
2003 साली झालेल्या विश्वचषकात वकार युनिस हा पाकिस्तान संघाचा कर्णधार होता. विश्वचषकात पाकिस्तानचा संघ भारतावर विजय का मिळवू शकत नाही? याचा खुलासा वकार युनूसने केला आहे.
वकार म्हणाला, “क्रिकेटच्या दुसऱ्या प्रकारात आम्ही चांगली कामगिरी केली आहे. कसोटीतही आमची कामगिरी दमदार आहे. पण विश्वचषकात भारत आमच्यापेक्षा नेहमीच चांगला खेळला आहे. विश्वचषकात पाकिस्तानचा संघ दबाव झेलू शकत नाही. त्यामुळे पराभव होतो. विश्वचषकात भारतीय संघ नेहमीच पाकिस्तानवर वरचढ ठरला आहे. ते कौतुकास पात्र आहेत. त्यांनी सतत चांगली खेळी केली आहे.”
“2003 साली भारतीय संघ मजबूत होता. त्यांनी आमच्या पेक्षाही चांगला खेळ केला. आम्ही स्मार्ट क्रिकेट खेळू शकलो नाही. संपूर्ण सामना आमच्या नियंत्रणात होता, तरी देखील आमचा पराभव झाला. 1996 आणि 2011 साली झालेला विश्वचषक पाहा. शेवटच्या क्षणाला आमचा पराभव झाला. मानसिक दबाव हे देखील या पराभवाचे कारण असू शकते,”असे वकार युनूसने सांगितले.
1992 सालापासून दोन्ही संघांचा सामना विश्वचषकात आतापर्यंत सात वेळा झाला आहे. सातही वेळा पाकिस्तानचा पराभव झाला आहे.