मंगळवारी (३० नोव्हेंबर) इंडियन प्रीमियर लीग २०२२ स्पर्धेसाठी सर्व जुन्या संघांनी रिटेन खेळाडूंची यादी जाहीर केली. लवकरच इंडियन प्रीमियर लीग २०२२ स्पर्धेचा मेगा लिलाव सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे सर्व जुन्या संघांना रिटेन केलेल्या खेळाडूंची नावे जाहीर करण्यास सांगितले होते. या रिटेन प्रक्रियेत दोन नावांची भरपूर चर्चा झाली ती म्हणजे केएल राहुल आणि राशिद खान. या दोन्ही खेळाडूंना आपआपल्या फ्रेंचायझींनी रिलीज केले आहे. केएल राहुलने स्वतःहून लिलावात जाण्याचा निर्णय घेतला होता. परंतु राशिद खानला का रिलीज केले? हा प्रश्न अनेकांना पडला असेल. काय आहे यामागील नेमकं कारण? चला जाणून घेऊया.
राशिद खान हा टी२० क्रिकेटमध्ये सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे. त्याने टी२० क्रिकेटमध्ये अनेक मोठ मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. तसेच गेल्या काही वर्षांपासून तो सनरायझर्स हैदराबाद संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. राशिद सारख्या अनुभवी गोलंदाजाला सनरायझर्स हैदराबाद संघाने रिलीज केल्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला असेल.
सनरायझर्स हैदराबादने जेव्हा २०१७ मध्ये राशिद खानला खरेदी केले होते. त्यावेळी त्याला ४ कोटी रुपये दिले होते. त्यानंतर २०१८ मध्ये झालेल्या मेगा लिलावात त्याला राईट टू मॅचचा वापर करून आपल्या संघात स्थान दिले होते. त्यावेळी त्याला ९ कोटी रुपये मिळालेले. आयपीएल २०२२ स्पर्धेच्या लिलावापुर्वी सनरायझर्स हैदराबाद संघाने राशिदला दुसरे प्राधान्य देत, रिटेन करण्याची ऑफर दिली होती. ज्यानुसार राशिदला ११ कोटी रुपये मिळणार होते. मात्र, राशिदला हे मान्य नव्हते. त्याला प्रथम प्राधान्य हवे होते. यावर काहीही चर्चा झाली नाही. राशिदच्या एजंटमुळे हे प्रकरण चिघळल्याचे म्हटले जात आहे. एका क्रिकेट संकेतस्थळाच्या वृत्तानुसार, सनरायझर्स हैदराबाद संघाचे राशिदसोबत चांगले संबंध आहेत. मात्र, एजंटसोबतचे संबंध बिघडले आहेत.
सनरायझर्स हैदराबाद संघाने केन विलियम्सनला प्रथम प्राधान्य देत रिटेन केले आहे. तसेच सनरायझर्स हैदराबाद संघाने अशी आशा व्यक्त केली आहे की, ते लिलावात राशिदला पुन्हा आपल्या संघात स्थान देतील. परंतु लखनौ किंवा अहमदाबाद हे दोन्ही संघ त्याला लिलावात जाण्यापूर्वीच मोठी रक्कम देऊन आपल्या संघात स्थान देऊ शकतात.