रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं आयपीएल 2025 साठी आपला संघ तयार केला आहे. मेगा लिलावात आरसीबीनं काही असे निर्णय घेतले, जे चाहत्यांच्या समजण्यापलीकडचे होते. आरसीबीनं मोहम्मद सिराज आणि विल जॅक्स सारख्या खेळाडूंवर राईट टू मॅच (RTM) कार्ड वापरलं नाही. आता लिलावानंतर संघाचा मेंटॉर दिनेश कार्तिक यानं याबाबत मोठा खुलासा केला आहे.
दिनेश कार्तिक यानं सांगितलं की त्यांनी विल जॅक्स आणि मोहम्मद सिराजसाठी आरटीएम का वापरलं नाही. कार्तिक म्हणाला की लिलावात काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. त्यामुळे आम्ही त्यांना घेऊ शकलो नाही. त्याचवेळी कार्तिकनं आपल्या संघाचा समतोल चांगला असल्याचं म्हटलं आहे.
कार्तिक म्हणाला, “सर्व प्रथम मी या टीमवर खूप आनंदी आहे. संघात खूप विविधता आहे. आम्ही जे लक्ष्य ठेवलं होतं, ते आम्ही साध्य केलं. आम्हाला सर्वोत्तम गोलंदाजी युनिट तयार करायचं होतं. आमच्याकडे मजबूत बॅटिंग युनिटही आहे. मला वाटतं की आम्ही हे साध्य केलंय. त्यामुळे मी म्हणेन की हा लिलाव आमच्यासाठी खूप चांगला होता.”
कार्तिक म्हणाला, “आमच्या बॅटिंग युनिटमध्ये फिल सॉल्ट, रजत पाटीदार, विराट कोहली, टिम डेव्हिड, लिव्हिंगस्टोन सारखे स्फोटक फलंदाज आहेत. टी20 क्रिकेटमध्ये ते खूप चांगले फलंदाज आहेत. गोलंदाजीत भुवनेश्वर कुमार, कृणाल पांड्या, जोश हेझलवूड यांना खूप अनुभव आहे. ”
यानंतर दिनेश कार्तिकनं मोहम्मद सिराजसाठी आरटीएम का वापरलं नाही हे सांगितलं. “मोहम्मद सिराज हा उत्कृष्ट गोलंदाज आहे. आम्हाला त्याचा अभिमान आहे. पण लिलावाचं वैशिष्ट्य म्हणजे, पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी वेगवेगळे खेळाडू असतात. त्यामुळे तुम्हाला विचार करावा लागतो. सिराजसाठी बोली सुरू असताना ती बरीच वर गेली. आम्हाला इतर खेळाडूंवरही लक्ष ठेवावं लागतं. त्यामुळे आम्हाला तो मिळू शकला नाही,” असं कार्तिक म्हणाला.
यानंतर दिनेश कार्तिक विल जॅक्सबाबत बोलला. कार्तिक म्हणाला, “आमची नजर विल जॅक्सवर होती. पण आम्ही फिल सॉल्ट आधीच घेतला होता. मधल्या फळीत आमच्याकडे लिव्हिंगस्टोन आणि टीम डेव्हिड होते. त्यामुळे उरलेल्या खेळाडूंचं काय करायचं हे काही मुद्दे समजून घ्यावे लागतील. आम्ही या कारणासाठी मोहम्मद सिराज आणि विल जॅक्सला सोडले, असं कार्तिक म्हणाला.
हेही वाचा –
कोणत्या संघाने किती खेळाडूंना खरेदी केले, कोणाकडे किती पैसे शिल्लक? पाहा सर्वकाही एका क्लिकवर
ऑस्ट्रेलियन संघात फूट पडली? जोश हेझलवूडच्या विधानानं खळबळ!
दिल्लीसोबतचं नातं संपल्यानंतर रिषभ पंतची भावनिक पोस्ट, चाहत्यांना उद्देशून म्हणाला…






