सध्या जगभरात टोकियो ऑलिम्पिकचे वारे वाहत आहेत. याचवेळी ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचाही समावेश असायला हवा असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. तसेच आयसीसी देखील क्रिकेटला ऑलिम्पिकमध्ये सामाविष्ट करण्यासाठी प्रयत्नशील आहे. असे असतानाच पाकिस्तानचा पाकिस्तानला माजी सलामीवीर सलमान बटने मोठे विधान केले आहे.
सलमान बट कोणत्याही किंमतीत वा बळजबरीने क्रिकेटला ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळवून देण्याच्या विचाराशी सहमत नाही. बटच्या मते खेळ कमी करून किंवा खेळाच्या स्वरुपात बदल करून जर ऑलिम्पिकमध्ये त्याचा समावेश केला तर आपण त्याचे मूळ स्वरूप गमावून बसू.
आपल्या यूट्यूब चॅनेलवर सलमान बट म्हणाला, “क्रिकेटला ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळवण्यासाठी आपण इतके उत्सुक का आहोत? क्रिकेट हा खेळ म्हणून जगात लोकप्रिय नाही का? क्रिकेट अजून ऑलिम्पिकचा भाग झालेला नाही. कदाचित क्रिकेट भविष्यात त्याचा एक भाग बनू शकेल. पण जर क्रिकेट त्याच्या खऱ्या आणि मूळ स्वरूपात ऑलिम्पिकचा भाग बनला नाही, तर त्याचा काही उपयोग होणार नाही.”
पुढे सलमान बट म्हणाला, “काही लोक विचार व्यक्त करतात की टी10 फॉरमॅट हा ऑलिम्पिकमध्ये जाऊ शकतो. आता तर हंड्रेड फॉरमॅटलाही स्थान दिले जाऊ शकते, असेही सांगितले जात आहे. क्रिकेट हा 11 खेळाडूंनी खेळला जाणारा सांघिक खेळ आहे. खेळताना केलेल्या कामगिरीचे समाधान, हे तरुणांना क्रिकेट खेळण्यासाठी एक मोठे कारण आहे, हे फक्त मूळ स्वरूपात साध्य होऊ शकते.”
“एक फुटबॉल सामना 90 मिनिटे चालतो. तर टी20 क्रिकेटचा फक्त एक डाव 90 मिनिटांचा आहे. लहान स्वरूपात मनोरंजनासाठी चांगले आहे. पण मला हे समजत नाही की आपण क्रिकेटला ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळवण्यासाठी इतके उतावीळ का आहोत?
सलमान बट म्हणाला, “क्रिकेटला हंड्रेड फॉरमॅटमध्ये आणण्याचे मुख्य कारण म्हणजे, टेलिव्हिजन अधिकारांद्वारे पैसे कमवण्याव्यतिरिक्त ऑलिम्पिकमध्ये त्याला स्थान मिळवणे, हे आहे. ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटच्या आगमनामुळे जास्त प्रेक्षक मिळतील, असे अनेकदा म्हटले जाते. खेळ लहान न करता किंवा त्याचा गाभा न बदलाताही हे करता येईल.”
महत्त्वाच्या बातम्या –
कौतुक तर होणारच! भारतीय हॉकी महिला संघाची ऑस्ट्रेलियाच्या उच्चायुक्तांनीही थोपटली पाठ