न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज यांच्या दरम्यान सुरू असलेल्या वेलिंग्टन कसोटीत वेस्ट इंडिजचा संघावर पुन्हा एकदा डावाने पराभूत करण्याची नामुष्की येऊ शकते. न्यूझीलंडने पहिल्या डावात उभारलेल्या ४६० धावांच्या प्रत्युत्तरात वेस्ट इंडीजचा पहिला डाव अवघ्या १३१ धावांवर आटोपला होता. त्यानंतर, फॉलोऑन खेळताना वेस्ट इंडीजने दुसर्या डावातही २४४ धावा काढण्यासाठी ६ गडी गमावले आहेत. तिसर्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी वेस्ट इंडीजचा कर्णधार जेसन होल्डर ६० आणि जोशुआ डी सिल्वा २५ धावांवर खेळत आहे. डावाने पराभव टाळण्यासाठी वेस्ट इंडीजला आणखी ८५ धावांची गरज आहे.
न्यूझीलंडने उभारल्या पहिल्या डावात ४६० धावा
उभय संघातील पहिल्या हॅमिल्टन कसोटीत न्यूझीलंडने वेस्ट इंडीजला एक डाव आणि १३४ धावांनी पराभूत केले होते. कर्णधार केन विल्यमसनने विक्रमी द्विशतक झळकावत, न्यूझीलंडच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला होता. दुसऱ्या कसोटीतही न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना हेन्री निकोल्सच्या शतकाच्या जोरावर ४६० धावा फलकावर लावल्या आहेत.
वेस्ट इंडीजची खराब फलंदाजी
न्यूझीलंडने पहिल्या डावात ४६० धावा केल्या नंतर, वेस्ट इंडिजचा पहिला डाव केवळ १३१ धावांवर संपुष्टात आला होता. जर्मन ब्लॅकवुडने वेस्ट इंडीजकडून सर्वाधिक ६९ धावा केल्या. न्यूझीलंडने वेस्ट इंडिजला फॉलोऑन दिल्यानंतर, दुसर्या डावातही वेस्ट इंडीज संघाची स्थिती फारशी सुधारली नाही.
होल्डरने सावरला वेस्ट इंडीजचा डाव
सलामीवीर जॉन कॅम्पबेलचे अर्धशतक व क्रेग ब्रेथवेट आणि शामराह ब्रुक्स यांच्या उपयुक्त खेळ्यांच्या जोरावर वेस्ट इंडिजने दुसऱ्या डावात २ बाद १३० अशी मजल मारली होती. मात्र, अवघ्या पाच धावांच्या अंतरात तीन गडी गमावल्याने वेस्ट इंडिजचा डाव घसरला. त्यानंतर, कर्णधार जेसन होल्डर व जोशुवा दा सिल्वा यांनी आणखी पडझड न होऊ देता, डाव सावरला. होल्डर अर्धशतक झळकावून नाबाद आहे. न्यूझीलंडकडून पहिल्या डावात एकही बळी न मिळवलेल्या ट्रेंट बोल्टने तीन बळी मिळवत न्यूझीलंडच्या गोलंदाजी आक्रमणाचे नेतृत्व केले.
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये पुढे आगेकूच करण्यासाठी न्यूझीलंडला या दोन कसोटीत सामन्यांच्या मालिकेत २-० ने विजय मिळवणे आवश्यक आहे. सध्यातरी, न्यूझीलंड त्या मार्गावर असल्याचे दिसत आहे.