एकेकाळी वेस्ट इंडिज संघाची क्रिकेट जगतात वेगळीच दहशत होती. विस्फोटक फलंदाज आणि विरोधी संघाच्या फलंदाजांना घाम फोडणाऱ्या गोलंदाजांच्या जोरावर वेस्ट इंडिज संघाने सलग दोन विश्वचषक (1975 आणि 1979) आपल्या नावावर केले होते. मात्र, सध्याचा वेस्ट इंडिज क्रिकेट संघ तितकी जबरदस्त कामगिरी करताना दिसत नाहीये. त्यांचे प्रदर्शन दिवसेंदिवस ढासळत आहे. अशात भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. यादरम्यान भारतीय कर्णधार रोहित शर्मा याला यजमानांच्या ढासळत्या प्रदर्शनाविषयी प्रश्न विचारण्यात आले, त्यावर रोहितने मोठी प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाला रोहित?
रोहित शर्मा (Rohit Sharma) याला प्रश्न विचारल्यावर तो म्हणाला की, त्याला माहिती नाही, आतमध्ये काय सुरू आहे. त्यामुळे तो याविषयी कोणतीही प्रतिक्रिया देऊ शकत नाही. मात्र, त्याने खेळाडूंविषयी नक्कीच भाष्य केले.
‘वेस्ट इंडिजकडे चांगले खेळाडू’
भारताविरुद्धचा पहिला कसोटी सामना वेस्ट इंडिज संघ वाईटरीत्या पराभूत झाला. दुसऱ्या कसोटीपूर्वी रोहितला विचारण्यात आले की, वेस्ट इंडिज क्रिकेटचा स्तर खालावत का आहे? यावर तो म्हणाला की, “एक चाहता म्हणून मी हे म्हणू शकतो की, मला आतमधील गोष्टी माहिती नाहीत, त्यामुळे मी कोणतेही मत मांडू शकत नाही. मी त्यांच्याविरुद्ध खेळलो आहे. मी एवढंच म्हणू शकतो की, त्यांच्याकडे खूप चांगले खेळाडू आहेत. प्रतिभेची कोणतीच कमतरता नाहीये. पहिल्या कसोटीतही जर त्यांचे फिरकीपटू असते, तर ते धोका निर्माण करू शकत होते. कारण, खेळपट्टीतून चेंडूंना खूपच वळण आणि उसळी मिळत होती.”
डॉमिनिकामध्ये भारताचा विजय
खरं तर, भारतीय संघाने डॉमिनिका येथे खेळलेला कसोटी सामना तिसऱ्या दिवशीच 1 डाव आणि 141 धावांनी जिंकला होता. आता वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघातील दुसरा कसोटी सामना त्रिनिदाद येथील क्वीन्स पार्क ओव्हल मैदानावर खेळला जाईल. हा सामना जिंकून भारतीय संघ मालिका 2-0ने जिंकण्याचा प्रयत्न करेल.
वेस्ट इंडिजविषयी बोलायचं झालं, तर मागील काही वर्षांपासून त्यांच्या क्रिकेटचा स्तर खूपच ढासळताना दिसत आहे. याचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की, यावर्षी होणाऱ्या विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेत त्यांना क्वालिफाय करता आले नाहीये. त्यांना नेदरलँड्स आणि झिम्बाब्वे संघांकडून पराभवाचा सामना करावा लागला. याव्यतिरिक्त मोठ्या संघांविरुद्ध वेस्ट इंडिज सातत्याने मालिका गमावताना दिसत आहे. (wi vs ind skipper rohit sharma reacts on west indies team downfall)
महत्त्वाच्या बातम्या-
तारीख ठरली! Asia Cup 2023मध्ये Team India ‘या’ दिवशी ठेचणार पाकिस्तानच्या नांग्या, लगेच वाचा
रसेलची मसल पावर! अमेरिकेत मारला स्पर्धेतील सर्वात लांब गगनचुंबी षटकार, पाहून डोळेच फिरतील