शनिवारचा (दि. 14 जुलै) दिवस भारतीय संघासाठी खास ठरला. 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या डॉमिनिका कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजचा भारतीय फलंदाज आणि गोलंदाजांपुढे टिकाव लागला नाही. त्यामुळे या सामन्यात भारताचा 1 डाव आणि 141 धावांनी विजय झाला. अशाप्रकारे भारतीय संघाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023-25 सायकलमधील पहिला सामना जिंकत 12 गुण मिळवले. या सामन्यातून कसोटी पदार्पण करत दीडशतकी खेळी साकारणाऱ्या यशस्वी जयसवालला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
या सामन्यात वेस्ट इंडिज संघाचा कर्णधार क्रेग ब्रेथवेट (Kraigg Brathwaite) नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्याचा हा निर्णय भारतीय संघाने चुकीचा ठरवला. यावेळी त्यांचा पहिला डाव अवघ्या 150 धावांवर संपुष्टात आला. त्यांच्याकडून एकही खेळाडू अर्धशतक करू शकला नव्हता. फक्त ऍलिक अथानाजे याने 47 धावांचे योगदान दिले होते. या डावात भारतीय संघाचा दिग्गज फिरकीपटू आर अश्विन (R Ashwin) याने उच्च दर्जाची गोलंदाजी करत 5 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच, रवींद्र जडेजा 3, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर प्रत्येकी 1 विकेट घेण्यात यशस्वी झाले होते.
यानंतर भारतीय संंघाकडून फलंदाजी करताना कर्णधार रोहित शर्मा आणि यशस्वी जयसवाल (Rohit Sharma And Yashasvi Jaiswal) यांनी संघाला शानदार सुरुवात करून दिली. त्यांनी पहिल्या विकेटसाठी 229 धावांची भागीदारी रचली. यामध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma) 103 धावांवर बाद झाला, तर यशस्वी जयसवाल (Yashasvi Jaiswal) याने 171 धावांची ऐतिहासिक खेळी साकारली. या खेळीसाठी त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. याव्यतिरिक्त विराट कोहली (Virat Kohli) यानेही 76 धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली, तर रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) 37 धावांवर नाबाद राहिला. भारतीय संघाने 5 विकेट्स गमावत 421 धावांवर डाव घोषित केला. त्यामुळे भारताला 271 धावांची आघाडी मिळाली.
https://twitter.com/BCCI/status/1679975050940743683
अश्विनच्या फिरकीसमोर वेस्ट इंडिज 130 धावांवर सर्वबाद
तिसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात जेव्हा भारतीय डाव घोषित झाला, त्यावेळी दिवसाच्या खेळातील जवळपास 50 षटके उरली होती. यानंतर अश्विनने आपल्या फिरकीची जादू दाखवत वेस्ट इंडिजचा दुसरा डाव उद्ध्वस्त करण्यात जास्त वेळ लावला नाही. 58 धावसंख्येवर वेस्ट इंडिजचा अर्धा संघ तंबूत परतला होता. त्यानंतर संपूर्ण संघ 130 धावा करून बाद झाला. दुसऱ्या डावातही यजमानांचा एकही फलंदाज चांगली फलंदाजी करू शकला नाही.
यजमानांच्या दुसऱ्या डावात अश्विनने सर्वाधिक 7 विकेट्स घेतल्या. जडेजाने 2, तर सिराजने 1 विकेट घेतली. अशाप्रकारे अश्विनने सामन्यात एकूण 12 विकेट्स घेतल्या. यासोबतच त्याने त्याच्या कारकीर्दीतील 34वे विकेट्सचे पंचकही पूर्ण केले. विशेष म्हणजे, 8 वेळा सामन्यात 10 विकेट्स घेण्याचा पराक्रमही गाजवला. या मालिकेत भारतीय संघ 1-0ने आघाडीवर आहे. तसेच, वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघातील दुसरा कसोटी सामना 20 ते 24 जुलैदरम्यान त्रिनिदादच्या क्वीन्सपार्क ओव्हल मैदानात पार पडणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
BREAKING: एशियन गेम्ससाठी भारतीय संघाची घोषणा! ऋतुराज करणार नेतृत्व, पाहा संपूर्ण संघ
आशियाई ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये तिरंगा डौलात! तजिंदर आणि पारुलचे सोनेरी यश