Jitesh Sharma Hit Wicket: भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जोहान्सबर्ग येथे पार पडलेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या टी20त 106 धावांनी दणदणीत विजय मिळवला. यासह टी20 मालिकाही 1-1ने बरोबरीत सोडवली. भारताने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 7 विकेट्स गमावत 201 धावा केल्या होत्या. डावाच्या अखेरच्या षटकात भारताने 3 विकेट्स गमावले. कर्णधार सूर्यकुमार यादव शतक करून पुढच्याच चेंडूवर बाद झाला. त्यानंतर रवींद्र जडेजा धावबाद झाला आणि जितेश शर्मा हिट विकेट झाला.
यष्टीरक्षक फलंदाज जितेश शर्मा (Jitesh Sharma) हिट विकेट होताच त्याच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद झाली. तो आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये हिट विकेट (Hit Wicket) पद्धतीने बाद होणारा पाचवा भारतीय खेळाडू बनला. त्याने भारताचा स्टार खेळाडू केएल राहुल (KL Rahul) आणि हार्दिक पंड्या (Hardik Pandya) यांच्या यादीत स्थान मिळवले.
जितेश शर्मा हिट विकेट
जोहान्सबर्ग येथील द वाँडरर्स स्टेडिअममध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताच्या डावातील अखेरच्या षटकातील पाचव्या चेंडूवर जितेश शर्मा मोठा शॉट मारण्याच्या प्रयत्नात होता. मात्र, तो क्रीझच्या खूपच आत गेला, ज्यामुळे स्टम्पला त्याच्या पायाचा स्पर्श झाला. यावेळी झाले असे की, स्टम्प्सला पाय लागताच बेल्स खाली पडल्या आणि जितेश हिटविकेट झाला. अशाप्रकारे बाद होणारा जितेश भारताचा पाचवा फलंदाज ठरला. त्याच्या आधी आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये केएल राहुल, हार्दिक पंड्या, हर्षल पटेल आणि श्रेयस अय्यर हेदेखील हिट विकेट झाले होते.
Hit Wicket OUT by Jitesh Sharma#INDvsSA | #INDvSA pic.twitter.com/p5u5C9NYDX
— Don Cricket 🏏 (@doncricket_) December 14, 2023
आंतरराष्ट्रीय टी20त हिट विकेट पद्धतीने बाद होणारे भारतीय
18 – केएल राहुल, विरुद्ध- श्रीलंका
18 – हर्षल पटेल, विरुद्ध- न्यूझीलंड
63 – हार्दिक पंड्या, विरुद्ध- इंग्लंड
13 – श्रेयस अय्यर, विरुद्ध- न्यूझीलंड
4 – जितेश शर्मा, विरुद्ध- दक्षिण आफ्रिका*
नियम काय सांगतो?
हिट विकेटबाबतचा नियम 35.1.1 नुसार, गोलंदाज जेव्हा चेंडू टाकत असेल आणि चेंडू हवेत असेल किंवा हातातून निघाला असेल, तेव्हा यादरम्याान फलंदाजाची बॅट किंवा शरीराचा कोणताही भाग स्टम्पला लागला आणि बेल्स खाली पडल्या, तर ही हिट विकेट मानली जाते. याचा अर्थ असा की, खेळताना धाव घेण्याच्या वेळी स्ट्रायकर फलंदाजाने बेल्स पाडल्या, तर त्याला हिट विकेट मानले जाते.
मालिकेत बरोबरी
दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (SA vs IND) संघातील तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील अखेरच्या सामन्यात भारत शंभरहून अधिक धावांनी जिंकला. या विजयासह भारताने मालिका 1-1ने बरोबरीत सोडवली. भारताने या सामन्यात सूर्यकुमारचे (100) शतक आणि यशस्वी जयसवाल (60) यांच्या जोरावर 201 धावांचा डोंगर उभारला. भारताच्या 202 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिका संघाकडून फक्त 3 फलंदाज 10 धावांचा आकडा पार करू शकले. त्यांचा डाव 13.5 षटकात 95 धावांवर संपुष्टात आला. यावेळी कुलदीप यादवने 5 विकेट्स घेतल्या. तसेच, रवींद्र जडेजा 2, तर मुकेश कुमार आणि अर्शदीप सिंग यांनी प्रत्येकी 1 विकेटवर नाव कोरले. (wicket Keeper Batsman jitesh sharma hit wicket created an unwanted record against south africa in 3rd t20 see batters list)
हेही वाचा-
बाबो! पदार्पणाच्या कसोटीत पाकिस्तानी गोलंदाजाचा कहर, ऑस्ट्रेलियाच्या अर्धा डझन फलंदाजांना दाखवला तंबूचा रस्ता
शॉट असा मारा की, काहीही होवो, पण सिक्स गेला पाहिजे! रसेलने धडपडत मारलेला षटकार पाहिला का? Video Viral