---Advertisement---

“मला भारतासाठी कसोटी क्रिकेट खेळायचं आहे”, आयपीएल सुपरस्टारचं मोठं व्यक्तव्य

On: बुधवार, ऑक्टोबर 16, 2024 12:33 PM
---Advertisement---

भारताचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसननं कसोटी क्रिकेट खेळण्याची इच्छा व्यक्ती केली आहे. त्यानं सांगितलं की, टीम इंडियाच्या नेतृत्वानं त्याला जास्तीत जास्त रणजी सामने खेळण्याचा सल्ला दिला. असं केल्यास त्याला भारताच्या कसोटी संघात संधी मिळू शकते.

संजू सॅमसननं नुकतेच बांगलादेशविरुद्ध टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 40 चेंडूत शतक झळकावलं होतं. यासह त्यानं आपली बुडणारी टी20 कारकीर्दही वाचवली. काही दिवसांनंतर त्याचा केरळच्या रणजी संघात समावेश करण्यात आला. आता तो या आठवड्यात होणाऱ्या रणजी सामन्यात खेळताना दिसू शकतो.

संजू सॅमसनकडे 64 प्रथम श्रेणी सामन्यांचा अनुभव आहे. परंतु अद्याप त्याला कसोटी संघात स्थान मिळवता आलेलं नाही. तो भारताकडून टी20 आणि एकदिवसीय क्रिकेट खेळला आहे. या दोन्ही फॉरमॅटमध्ये काही प्रसंगी चांगली कामगिरी केल्यानंतर संजू आता कसोटी क्रिकेट खेळण्याकडे लक्ष देत आहे. दुलीप ट्रॉफी 2024 पूर्वी टीम इंडियाच्या नेतृत्व गटानं त्याला सांगितलं की, त्यानं शक्य तितकं प्रथम श्रेणी सामने खेळावेत. या नेतृत्व गटात कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांचा समावेश आहे.

‘स्पोर्टस्टार’शी बोलताना संजू म्हणाला, “माझा विश्वास आहे की, माझ्याकडे लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये यशस्वी होण्यासाठीचं कौशल्य आहे. मला स्वत:ला फक्त पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटपुरतं मर्यादित ठेवायचं नाही. मला भारतासाठी कसोटी क्रिकेट खेळायचं आहे. दुलीप ट्रॉफीच्या आधी नेतृत्व गटानं मला सांगितलं होतं की ते रेड बॉल क्रिकेटसाठी माझा विचार करत आहेत. मला त्यांनी हे गांभीर्यानं घेण्यास आणि जास्तीत जास्त रणजी ट्रॉफी सामने खेळण्यास सांगितलं.”

सॅमसन याविषयी पुढे बोलताना म्हणाला की, “यावेळी माझी तयारी चांगली होती. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेनंतर मी राहुल द्रविड सर आणि झुबिन भरुचा यांच्यासोबत आरआर अकादमीमध्ये सराव केला आणि माझ्या खेळावर काम केलं. दुलीप ट्रॉफीमधील शतकानं मला खूप आत्मविश्वास दिला. हे शतक देशातील काही सर्वोत्तम गोलंदाजांविरुद्ध आलं होतं.

संजू सॅमसननं भारतासाठी एकदिवसीय आणि टी20 आंतरराष्ट्रीयमध्ये शतक झळकावलं आहे. सध्या रिषभ पंत यष्टीरक्षक फलंदाज म्हणून भारतीय संघासोबत आहे. मात्र आगामी काळात या जागेसाठी संजू सॅमसनचाही विचार होऊ शकतो.

हेही वाचा – 

6 चेंडू 6 चाैकार, श्रीलंकेच्या युवा खेळाडूने वेस्ट इंडिजच्या स्टार गोलंदाजाला धो धो धुतले…
गुरुवर शिष्य भारी! महान बुद्धीबळपटू विश्वनाथन आनंद यांचा शिष्याकडून पराभव
आपल्याच खेळाडूच्या कानशीलात लगावली, या संघाच्या मुख्य प्रशिक्षकाचं तत्काळ निलंबन!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---