---Advertisement---

पुजारा, विराटची विकेट घेत न्यूझीलंडच्या या गोलंदाजाने केले स्वप्नवत कसोटी पदार्पण

On: शुक्रवार, फेब्रुवारी 21, 2020 12:35 PM
---Advertisement---

वेलिंग्टन। आजपासून(21 फेब्रुवारी) न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना सुरु झाला आहे. या सामन्यातून न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज काईल जेमिसनने कसोटी पदार्पण केले आहे. तो न्यूझीलंडकडून कसोटीत पदार्पण करणारा 279 वा खेळाडू ठरला आहे.

त्याने पदार्पणाच्या सामन्यातच शानदार कामगिरी केली आहे. त्याने आज पहिल्या दिवसाखेर 14 षटके गोलंदाजी करताना 38 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. यामध्ये त्याने चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि हनुमा विहारी या भारतीय फलंदाजांच्या विकेट्स घेतल्या.

6 फूट 8 इंच उंची असणाऱ्या जेमिसनने 16 व्या षटकात भारताचा मधल्या फळीतील फलंदाज पुजाराला 11 धावांवर बाद करत पहिली कसोटी विकेट घेतली. त्याच्या गोलंदाजीवर पुजाराचा झेल यष्टीरक्षक बीजे वॉटलिंगने घेतला.

पुजारा पाठोपाठ 18 व्या षटकात जेमिसनने भारताचा कर्णधार विराटला बाद केले. विराटचा झेल पहिल्या स्लिपमध्ये उभ्या असणाऱ्या रॉस टेलरने घेतला. त्यामुळे विराटला 2 धावांवर विकेट गमवावी लागली. विराट आणि पुजाराच्या विकेट्स जेमिसनने सामन्याच्या पहिल्याच सत्रात घेतल्या. त्यानंतर दुसऱ्या सत्रात 42 व्या षटकात जेमिसनने विहारीला 7 धावांवर बाद केले. विहारीचा झेलही यष्टीरक्षक वॉटलिंगने घेतला.

एवढेच नाही तर जेमिसनने क्षेत्ररक्षण करतानाही भारताचा सलामीवीर फलंदाज मयंक अगरवालचा ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर लाँग लेगला झेल घेतला. त्यावेळी अगरवाल 34 धावांवर होता.

जेमिसनच्या या शानदार कामगिरीमुळे आज भारतीय फलंदाजांना सावध खेळ करावा लागला. भारताने आज पहिल्या दिवसाखेर 55 षटकात 5 बाद 122 धावा केल्या. यावेळी अजिंक्य रहाणे 38 आणि रिषभ पंत 10 धावांवर नाबाद खेळत आहेत. आजच्या दिवसाचा खेळ पावसाच्या व्यत्ययामुळे दुसऱ्या सत्रानंतर थांबवण्यात आला त्यामुळे आज 55 षटकांचाच खेळ झाला.

तसेच आज विराट, पुजारा, अगरवाल आणि विहारी व्यतिरिक्त पृथ्वी शॉनेही चांगल्या सुरुवातीनंतर लवकर विकेट गमावली. शॉ 2 चौकारांसह 16 धावांवर टिम साऊथीच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला.

जेमिसनचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट पदार्पणही अविस्मरणीय – 

जेमिसनने याआधी भारताविरुद्धच्या वनडे मालिकेतील दुसऱ्या वनडे सामन्यातून 8 फेब्रुवारीला वनडेबरोबर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यावेळीही त्याने शानदार कामगिरी करताना नाबाद 25 धावा केल्या होत्या आणि 2 विकेट्स घेतल्या होत्या. त्यावेळी त्याने पृथ्वी शॉ आणि नवदीप सैनीची विकेट घेतली होती. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला होता.

https://twitter.com/Maha_Sports/status/1230736216166780928

https://twitter.com/Maha_Sports/status/1230719672850382849

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---